पॅरिस ऑलिम्पिकचे उद्घाटन 26 जुलैला होणार असले तरी या क्रीडामहोत्सवातील फुटबॉल सामन्यांना बुधवारपासून सुरुवात झाली. युरो चषक विजेत्या स्पेनने विजयी सलामी दिली आहे, मात्र दुसरीकडे कोपा अमेरिका स्पर्धेतील विजेत्या अर्जेंटिना सलामीलाच कसेबसे बरोबरीवर समाधान मानावे लागले.
स्पेन आणि अर्जेंटिना या दोन्ही संघांनी दुय्यम दर्जाचे संघ ऑलिम्पिकच्या स्वारीवर पाठविले आहेत. ‘क’ गटातील लढतीत स्पेनने उझबेकिस्तानवर 2-1 गोलफरकाने विजय मिळविला. स्पेनकडून मार्क पुबिलने 29 व्या मिनिटाला गोल केला. एल्डर शोमुरोडोव्ह 48 व्या मिनिटाला गोल करून उझबेकिस्तानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. मध्यंतरानंतर सर्गिओ गोमेझने 62व्या मिनिटाला गोल करीत स्पेनला पुन्हा 2-1 असे आघाडीवर नेले. ही आघाडी टिकवत स्पेनने विजयावर शिक्कामोर्तब केले.
‘ब’ गटाच्या लढतीत मोरोक्कोने बलाढय़ अर्जेंटिनाला 2-2 गोल बरोबरीत रोखण्यात यश मिळविले. रहिम सौफिनने 47 व्या मिनिटाला गोल करीत मोरोक्कोचे खाते उघडले. मग 49 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत मोरोक्कोने 2-0 अशी मुसंडी मारली. त्यानंतर सिमॉन गियूलिनोने 68 व्या मिनिटाला गोल करीत अर्जेंटिनासाठी 1-2 असे अंतर कमी केले. मग 90औ16 व्या मिनिटाला मेडिना ख्रिस्टीयनने गोल करीत अर्जेंटिनाचा पराभव कसाबसा टाळला.