विनेशविरोधात सरकारचं षडयंत्र, कुस्ती महासंघाचाही हात; कुटुंबियांचा गंभीर आरोप

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आल्याने तिच्यासह देशवासियांना आणि तिच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे. विनेशला अपात्र ठरवल्याने आता तिच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विनेशच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केला आहे. विनेश विरोधात कुस्ती महासंघाने षडयंत्र रचल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. 100 ग्रॅम एवढं जास्त असतं का? डोक्यावरच्या केसांचं वजनही तेवढं भरतं. या मागे सरकार आणि बृजभूषण शरण सिंह यांचा हात असल्याचा गंभीर आरोप विनेशचे सासरे राजपाल राठी यांनी केला. राजपाल राठी यांनी एबीपी न्यूजला ही प्रतिक्रिया दिली.

आम्हाला मोठा धक्का बसला आहे. यात राजकारण केलं जात आहे. हे सर्व षडयंत्र सुरू आहे. यामध्ये सरकारचा हात आहे. 100 ग्रॅम वजनामुळे स्पर्धेबाहेर कोण काढतं का? डोक्यावरच्या केसांमुळेही 100 ग्रॅम वजन वाढतं. सपोर्ट स्टाफने कुठलीही मदत केलेली नाही. सपोर्ट स्टाफला परवानगी दिली नाही, असा आरोप विनेशचे सासरे राजपाल राठी यांनी केला.

अद्याप विनेश फोगाटशी आमचं बोलणं झालेलं नाही. आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचं विनेश सतत सांगत आली आहे. जयपूरसह इतर ठिकाणीही तिने अशी विधानं केली आहेत. विनेशला बाहेर केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. काल लढत झाली त्यावेळी तिचं वजन कसं वाढलं नाही? असा त्यांनी उपस्थित केला. या निर्णयाला आमचा विरोध आहे, असे विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी म्हणाले.