ऑलिम्पिक यजमानपदासाठी हिंदुस्थानने उत्सुकता दाखवली हे खूप चांगले आहे, मात्र दुसऱया देशात ऑलिम्पिकच्या तयारीला सुरुवातदेखील झाली आहे. आपण मात्र अजून आराखडा बनवण्यातच अडकून पडलो आहोत. त्यामुळे या तयारीला गती मिळणार कधी, असा सवाल हिंदुस्थानची ऑलिम्पियन नेमबाज अंजली भागवत यांनी केला.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या सहकार्याने पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात ऑलिम्पिक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात अंजली भागवत बोलत होत्या. राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उपस्थित ऑलिम्पियन खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी देशासाठी क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करणारे धनराज पिल्ले, अंजली भागवत, देविंदर वाल्मीकी, विक्रम पिल्ले यांच्यासह अनेक ऑलिम्पियन तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडापटू या ऑलिम्पिक दिनानिमित्त आयोजित समारोहाला उपस्थित होते.
सकाळी लालमहाल येथून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून क्रीडा रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीतही अनेक खेळाडू, क्रीडा संघटक उपस्थित होते. स. प. महाविद्यालयात रॅलीची सांगता झाल्यावर झालेल्या सोहळय़ात क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उपस्थित ऑलिम्पियन खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर जिम्नॅस्टिक, वूशू, मार्शल आर्ट, मुष्टियुद्ध, तायक्वाँदो, योगासन, मल्लखांब अशा अनेक खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. हिंदुस्थानी हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले यांनी आपल्या भाषणात खेळाडूंवर अन्याय होणार नाही याकडे सर्वाधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.
रखडलेले शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार लवकरच!
यावेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे म्हणाले, शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा काही कारणांनी रखडला आहे. मात्र लवकरच या सोहळय़ाचा दिवस निश्चित करून भव्य स्वरूपात हा कार्यक्रम घेण्याचेही आश्वासन बनसोडे यांनी दिले. ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा देताना क्रीडामंत्र्यांनी इनडोअर क्रीडा सुविधांसाठी सात लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली.