Paris Olympics 2024 महिला स्विमिंग टीमवरील लैंगिक टिप्पणी भोवली; ऑलिम्पिक समालोचकाची हकालपट्टी

Bob Ballard Olympic Commentator

टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर युरोस्पोर्टने रविवारी त्याच्या पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) कव्हरेजमधून एका समालोचकाची हकालपट्टी केली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण त्याने जलतरण स्पर्धेदरम्यान (swimming competition) लैंगिक टिप्पणी केली होती.

बॉब बॅलार्ड युरोस्पोर्टवर समालोचनाचं काम करतात. बॉब बॅलार्डने शनिवारी महिलांच्या 4×100 मीटर फ्रीस्टाइल रिलेमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या जलतरणपटूंबद्दल टिप्पणी केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका क्लिपमध्ये, बॅलार्ड म्हणाला; ‘ठीक आहे, स्त्रिया नुकतीच (स्पर्धा) पूर्ण करत आहेत. तुम्हाला माहिती आहे की स्त्रिया कशा असतात… इकडे तिकडे फिरणे, मेकअप करणे’.

बॅलार्डचे सह-समालोचक लिझी सिमंड्स यांनी या टिप्पणीला ‘अपमानकारक’ म्हटले.

‘काल रात्री युरोस्पोर्टच्या कव्हरेजच्या एका भागादरम्यान, समालोचक बॉब बॅलार्ड यांनी एक अयोग्य टिप्पणी केली’, असं युरोस्पोर्टनं एका निवेदनात म्हटलं आहे. पुढे त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘त्यासाठी, त्याला आमच्या समालोचन टीममधून तत्काळ काढून टाकण्यात आले आहे’.

बॅलार्डकडून या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.