बुडापेस्टमध्ये (हंगेरी) 45व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये रविवारी सुवर्णपदके जिंकून इतिहास घडविणाऱ्या हिंदुस्थानच्या पुरुष व महिला संघांचे जोरदार स्वागत झाले. डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, आर. वैशाली व पुरुष संघाचा कर्णधार श्रीनाथ नारायणन मंगळवारी सकाळी चेन्नई विमानतळावर दाखल झाले. यावेळी चाहते, अधिकारी वर्ग आणि कुटुंबीययांकडून झालेल्या जंगी स्वागतामुळे सुवर्णपदक विजेते खेळाडू भारावून गेले.
प्रज्ञानंद व वैशाली हे बंधू-भगिनी सर्वात प्रथम विमानतळाबाहेर आले. त्यानंतर गुकेशचे आगमन झाले. या सर्वांना बघून चाहत्यांनी गगनभेदी आवाजात या सुवर्णपदक विजेत्यांचा जयजयकार केला. हार, पुष्पगुच्छ आणि शाल-श्रीफळ देऊन चाहत्यांनी या खेळाडूंचा गौरव गेला. याचबरोबर खेळाडूंसोबत सेल्फी घेण्यासाठीही नागरिकांची झुंबड उडाली होती.