>> डॉ. प्रसाद कदम
बालकविता म्हटलं की परी, स्वप्नांचा महल, चॉकलेटचा बंगला, चांदोमामा ढगोबा आदी काल्पनिक चित्रं प्रामुख्यानं रेखाटली जातात. हे कल्पनाविश्व साकारणं चुकीचं नाही. त्यातून मनोरंजन, कुतूहल, सृष्टीचे बहुविध पैलू उमगून येतात. हल्ली सभोवताली कित्येक छोट्या, मोठ्या समस्या भेडसावत आहेत. अशा गुंतागुंतीच्या जटील समस्यांची किमान ओळख करून देणं महत्त्वाचं ठरतं. अशाच स्वरूपाचा प्रयोग बाल साहित्यिक रा. को. खेडकर यांनी ‘ओला हिरवा शिवार गारवा’ या संग्रहाद्वारे केला आहे. ‘ओला हिरवा शिवार गारवा’ या शीर्षकातूनच ही कविता सकस, बाळसेदार असावी हा तर्क पुढे सत्यात उतरल्याचा वारंवार प्रत्यय येतो. एकूण 78 कविता असलेल्या या संग्रहात निसर्ग, रानशिवार, पशुपाखरे, शेतकरी कष्टकरी, सण, उत्सव, संस्कृतीसह नैतिक मूल्यांची पेरणी केलेली आहे. रानशिवाराचा फेरफटका घडवून आणणारी सळसळत्या कोवळय़ा कोंबासारखी निर्मळ, नितळ, लाघवी, आनंदविभोर करणारी ही कविता आहे. आई ही प्रत्येकाच्या जीवनातली अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे. शेतकरी परिवारात बापाच्या खांद्याला खांदा लावून आई संसार पेलत रानातल्या कामालाही हातभार लावते. दुपारच्या वेळी भाकरी घेऊन येणाऱ्या आईकडे पाहताना कवी लिहितो…
आली आली माझी माय, आली बांध तुडवीत
तिला पाहता दुरून, उतरला शिणभाग
आईच जीवनाचा पोशिंदा आहे. संसाराच्या गाडीचं दुसरं चाक आहे हा आश्वासक भाव ही कविता देते. ‘ओला हिरवा शिवार गारवा, झाडीत घुमतो पक्षी बावरा, हिरवे कोंभ कोवळे पाते, पानाआडून कोकिळा गाते’ अशा नादमधूर, आशयगर्भ शब्दांमधून कवी रानाशिवाराचं मनमोहक रूप वाचकांसमोर प्रकट करतो. या कवितांमधून ग्राम जीवनाचं मनोहारी, वास्तववादी दर्शन पानापानांतून अधोरेखित होते. सण, उत्सव, संस्कृती यामुळे जीवनात रंग भरले जातात. तनामनांत चैतन्य निर्माण होतं. या सणांसोबतच ऋतुपाच्या मोहक छटाही अनेक कवितांमधून मनावर मोहिनी घालतात. या कविता निश्चितच बालकिशोरांना आपलंसं करण्यात नक्कीच यशस्वी ठरतील.