
दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवाने खूशखबर दिली आहे. तब्बल 40 वर्षांनंतर कासवाने रायगडच्या किहीम किनाऱ्यावर येऊन 150 अंडी दिली असून दीड महिन्यात ‘ऑलिव्ह रिडले’चा पाळणा हलणार आहे. ही गुड न्यूज समजताच उपवनसंरक्षक कांचन पवार यांच्यासह वनाधिकाऱ्यांनी किहीमच्या किनाऱ्यावर धाव घेत अंडी असलेल्या जागेवर संरक्षक कुंपण घातले आहे.
अलिबागजवळच्या किहीम समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ होत चाललेल्या कासवाच्या प्रजातीच्या मादीने मंगळवारी दुपारी भरतीच्या वेळी किनाऱ्यावर येऊन घरटे नैसर्गिक घरटे बांधले. त्यानंतर त्यात तब्बल 150 अंडी घालून मादी समुद्रात परतली. याबाबत रायगड वनविभागाच्या कांदळवन कक्षाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर समीर शिंदे यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्र कासवाने घातलेली अंडी दुर्मिळ असल्याने त्याचे संरक्षण करण्यात येत आहे. संरक्षणासाठी घरट्याच्या चारही बाजूने जाळी लावण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
तब्बल 40 वर्षांनी समुद्री कासवाने किहीम समुद्रकिनारी घरटे करून अंडी घातलेल्या ठिकाणी वनविभागाच्या कांदळवन विभागाच्या उपवनसंरक्षक कांचन पवार, वन अधिकारी प्रियांका पाटील, आरएफओ समीर शिंदे व किहीम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी करून संरक्षणात्मक उपाययोजना केल्या आहेत. प्राकृतिक अधिवास उष्ण कटिबंध व उपोष्ण कटिबंध असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीचे वजन 50 किलोग्रॅमपर्यंत असते तर लांबी 60 ते 70 सेंटीमीटर असते. त्यांचा विणीचा हंगाम प्रामुख्याने नोव्हेंबर ते मार्च असा पाच महिन्यांचा असतो