हेरिटेज ‘ट्राम’मध्ये बाप्पा विराजमान, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी साकारला देखावा

घाटकोपर येथे राहणाऱ्या राहुल गोकुल वारिया यांनी या वर्षी गणेशोत्सवात मुंबईच्या जुन्या ट्रामची प्रतिकृती आपल्या घरी तयार केली आहे. ही अनोखी सजावट पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. राहुल वारिया व्यवसायाने कमर्शियल आर्टिस्ट असून जाहिरात क्षेत्रात आर्ट डायरेक्टर म्हणून काम करतो. दरवर्षी तो गणपतीसाठी अनोखी सजावट करतो. खासकरून मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची साधने ही त्याची थीम असते. मग डबल डेकर बस असेल किंवा मेट्रो… या वर्षी राहुलने एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या ट्रामची प्रतिकृती साकारली आहे.

ट्राम ज्या मार्गावरून धावत होती त्या मार्गावरील रॉक्सी सिनेमा, रिगल सिनेमा अशी आजूबाजूची दृश्येही बॅकग्राऊंडमध्ये दिसत आहेत. सुरुवातीला ट्राम घोड्यांद्वारे चालवल्या जात होत्या. नंतर मे 1907 मध्ये मुंबई इलेक्ट्रिक ट्राम सुरू करण्यात आल्या. ट्राम सर्व्हिस इतकी यशस्वी झाली की, सप्टेंबर 1920 मध्ये डबल डेकर इलेक्ट्रिक ट्राम सुरू करण्यात आल्या.

90 वर्षे सेवा दिल्यानंतर शेवटची ट्राम 31 मार्च 1964 साली धावली आणि ट्राम सर्व्हिस बंद झाली. गणेशोत्सवात राहुल यांनी तो काळ पुन्हा जागवला आहे. ट्रामचा संकल्पना देखावा चार फूट बाय चार फूट उभारण्यात आला आहे. यामध्ये राहुलला त्याचे कुटुंबीय आणि मित्र मौलिक रावल यांनी मदत केली.

आम्ही मुंबईत राहतो, खूप प्रवास करतो. पण आज आपल्याला इथल्या हेरिटेज ट्रामचा आता विसर पडला आहे. पुढच्या पिढीला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मुंबईत सुरुवातीला घोडागाडी चालवल्या जात होत्या, त्यानंतर या ट्राम आल्या. मुंबईच्या पहिल्या परिवहन सेवेची लोकांना जाणीव करून देण्याची माझी इच्छा आहे, म्हणूनच मी या प्रकल्पाचे नाव ‘ मिसिंग ट्राम’ असे ठेवल्याचे राहुल वारिया याने सांगितले.