कोंबड्याच्या बांगेमुळे झोपमोड; आजोबांची थेट पोलिसांकडे धाव

कोणाला कधी कशाचा त्रास होईल, याचा नेम नाही. केरळमधील पठनमथिट्टा जिह्यातील पल्लिक्कल गावात भल्या पहाटे कोंबड्याच्या बांगेमुळे एका म्हाताऱ्या व्यक्तीची झोपमोड होत होती. त्यामुळे म्हाताऱ्याने थेट पोलीस स्टेशन गाठून या कोंबड्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राधाकृष्ण कुरूप असे या आजोबांचे नाव असून त्यांच्या शेजारी अनिल कुमार राहतात. ते वरच्या मजल्यावर आपल्या कोंबड्याचे संगोपण करतात, परंतु त्यांच्या कोंबड्याचा आवाज जास्त असल्याने राधापृष्ण कुरूप यांना पुरेशी झोप मिळत नाही.

अनिल कुमार यांचा कोंबडा दररोज भल्या पहाटे म्हणजेच सकाळी 3 वाजता बांग देतो. कोंबड्यामुळे माझी झोपमोड होत आहे. या कोंबड्याचा काही तरी बंदोबस्त करा, असे या आजोबांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. राधापृष्ण कुरूप यांच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असून अधिकाऱ्यांनी तातडीने एक पथक घटनास्थळी पाठवले आहे. अनिल कुमार यांनी आपल्या कोंबड्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करावी, यासाठी प्रशासनाने 14 दिवसांची मुदत दिली आहे.