वृद्धापकाळात एकमेकांची काठी बनून राहण्याचे दिवस संपले असून ब्रिटन, अमेरिका, नेदरलँड्स आणि कॅनडासारख्या देशांत आता वृद्ध जोडप्यांमध्ये स्वतंत्र घरामध्ये राहण्याचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यूके हाऊसहोल्ड लाँगिटयुडिनल स्टडीच्या पाहणीतून हा निष्कर्ष समोर आला असून याला ‘लिव्हिंग अपार्ट बट टुगेदर’ असे म्हटले जात आहे. याचा अर्थ हे वृद्ध जोडपे एकमेकांसोबत राहत असूनदेखील वेगवेगळ्या घरात राहण्याला पसंती देत आहेत. यामुळे त्यांना मानसिक व भावनात्मकदृष्टय़ा लाभ मिळत असल्याचे बोलले जात आहे. एका छताखाली राहून लहानसहान भांडणे व मतभेद वाढण्याचा धोका असतो. परंतु वेगळे राहून प्रेम व ओलावा यांची जाणीव जास्त बळकट होते, असे या दांपत्यांचे म्हणणे आहे. यूके हाऊसहोल्ड लाँगिटयुडिनल स्टडीचा हा अहवाल 2011 ते 2023 या काळातील असून अभ्यासातून जवळपास एक लाखाहून अधिक वृद्ध दांपत्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. ही व्यवस्था स्वतःला आणि जोडीदारालाही सुखद अनुभव देणारी आहे. महिलांना आपल्या स्वप्नानुसार जगण्याचे स्वातंत्र्य मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे.
घटस्फोटाचा धोका कमी
वृद्ध दांपत्यांनी एकाच घरात वेगवेगळे राहणे अनेक वेळा मानसिक आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते, परंतु वेगळे राहिल्याने समस्या कमी होते. तसेच घटस्फोटाचा धोका कमी होतो. मिरियम मार्गोलीस व हिथर सदरलँड हे जोडपे 12 वर्षांपासून वेगळे राहतात. हेलेना बोनहम कार्टर व टिम बर्टन यांची जोडी 13 वर्षांपासून वेगवेगळ्या घरांत राहून आपले नाते इमानेइतबारे निभावण्याचा प्रयत्न करतात.
हा ट्रेंड पसरतोय
जगात सर्वात आधी ब्रिटनसारख्या पुढारलेल्या देशात सुरू झालेला वृद्ध दांपत्यांचा हा ट्रेंड आता हळूहळू ब्रिटनव्यतिरीक्त इतर देशांमध्येसुद्धा पसरत आहे. अमेरिका, नेदरलँड्स, कॅनडा यांसारख्या देशांत हा ट्रेंड पाहायला मिळत आहे. कॅनडात तर तरुणांनीही ही व्यवस्था स्वीकारली आहे.