विधान भवनातील ग्रंथसंपदा धूळ खात, मंत्री बसतात पंचतारांकित दालनात; मार्गदर्शक ग्रंथ मात्र व्हरांड्यात

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, मंत्री, राज्यमंत्र्यांची दालने कोटय़वधी रुपये खर्च करून पंचतारांकित हॉटेलसारखी सजवली आहेत. मात्र, याच सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना मार्गदर्शन करणारे ग्रंथ मात्र व्हरांड्यात हातपाय दुमडून डोक्यावर छत मिळतेय काय याची वाट बघत गेल्या काही वर्षांपासून उभे आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्याच अधिवेशनासाठी मुंबईतील विधान भवनाचा चेहरामोहरा बदलून तो चकाचक करण्याचे काम महायुती सरकारकडून सुरू आहे. काही दालनांचे सुशोभीकरण पूर्ण झाले आहे. दालनांच्या बाहेर झगमगणारे दिवे, आलिशान खुर्च्या, उंची फर्निचर असे पंचतारांकित बदल करण्यात आले आहेत. अधिवेशन सुरू असल्यामुळे हे काम आता थांबवण्यात आले. मात्र, याच विधान भवनाच्या ग्रंथालयात 100 वर्षांहून अधिक काळ जतन करून ठेवण्यात आलेली अनेक पुस्तके, ग्रंथांसाठी मात्र अजूनही योग्य ती जागा सापडत नसल्यामुळे ती व्हरांड्यात एकावर एक रचून बांधून ठेवण्यात आली आहेत.

स्पॅनिंगचे काम सुरू 

शेकडो संदर्भग्रंथ सहाव्या मजल्यावरील लिफ्टजवळ रचून ठेवण्यात आले असून या ग्रंथांचे स्पॅनिंग करण्याचे काम सुरू आहे. काही पुस्तके खूप जुनी झाली असून त्यांची पानेही खराब झाली आहेत. मात्र, या पुस्तकांचे स्पॅनिंग झाल्यावर ही पुस्तके रद्दीत देण्याची शक्यता आहे. मात्र, हे स्पॅनिंग कधीपासून सुरू आहे आणि ते कधी संपणार हे मात्र कोणालाही माहीत नाही.

डागडुजी कोटय़वधीची, पण पुस्तकांसाठी जागा नाही 

विधान भवनाच्या डागडुजीसाठी दरवर्षी कोटय़वधी रुपयांची तरतूद केली जाते. या वर्षी त्यासाठी अर्थसंकल्पात 586 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार डागडुजी, रंगरंगोटी केली जाते. जागा, दालनाची अदलाबदल केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ग्रंथालयाची ही पुस्तके व्हरांड्यात धूळ खात पडली असून त्यांना अजूनही योग्य ती जागा मिळालेली नाही.