
कुठल्याही देशातील प्रमुख शहरे ही दळवळणाची केंद्र असतात. त्यामुळेच त्याठिकाणी कार्यालये आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींचा भरणा असतो. नुकताच वेस्टियनने दाखल केलेल्या अहवालाच्या मते, 2024 मध्ये हिंदुस्थानातील सात प्रमुख शहरांमध्ये ऑफिसचे भाडे दरवर्षी वाढलेले आहे. इतकेच नव्हे तर, आठ मोठ्या परदेशी बाजारपेठांमध्ये भाडे वाढीचा कल संमिश्र होता. रिअल इस्टेट कन्सल्टंट वेस्टियनच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये न्यू यॉर्कमधील सरासरी ऑफिस भाडे 1.3 टक्क्यांवरुन प्रति चौरस फूट $7.5 इतके झाले. शांघायमध्ये 6.8 टक्क्यांनी घट होऊन प्रति चौरस फूट $2.8 इतके झाले, तर हाँगकाँगमध्ये 6 टक्क्यांनी घट होऊन प्रति चौरस फूट $5.9 इतके झाले. 2024 मध्ये सिएटलमधील ऑफिस भाडे 1.9 टक्क्यांनी घसरून प्रति चौरस फूट $4.7 इतके झाले. तथापि, लंडनमध्ये सरासरी ऑफिस भाडे 8.6 टक्क्यांनी वाढून प्रति चौरस फूट $8.6 इतके झाले. 2024 मध्ये सिंगापूरमधील सरासरी ऑफिस भाडे 0.5 टक्क्यांनी वाढून प्रति चौरस फूट प्रति महिना 7 डॉलर झाले. आजच्या घडीला हिंदुस्थानातील 7 शहरातील आॅफिस भाडे हे जवळपास 4 ते 8 टक्क्यांनी वाढलेले आहे.
जागतिक बाजारपेठांमध्ये ऑफिस भाड्यात घट जनरेटिव्ह एआय सारख्या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे आणि ऑफिस स्पेस वापरण्याच्या धोरणांमध्ये बदल झाल्यामुळे झाली आहे. सात हिंदुस्थानी शहरांपैकी, मुंबईत मासिक सरासरी ऑफिस भाड्यात 6.7 टक्क्यांनी वाढ होऊन प्रति चौरस फूट $1.6 झाले आहे.
हिंदुस्थानच्या राजधानीमध्ये दिल्लीत मासिक भाड्यात 8.2 टक्क्यांनी वाढ होऊन प्रति चौरस फूट $0.9 झाले आहे. सध्याच्या घडीला बेंगळुरूमध्ये 4.7 टक्क्यांनी वाढ होऊन प्रति चौरस फूट $1.1 झालेले आहे. केवळ इतकेच नाही तर, पुण्यात सरासरी मासिक ऑफिस भाडे 2024 मध्ये प्रति चौरस फूट $1 झाले म्हणजेच वार्षिक 4.5 टक्क्यांनी वाढले.
चेन्नईमध्ये 2014 मध्ये मासिक ऑफिस भाडे 0.8 प्रति चौरस फूट होते. यात वार्षिक 7.7 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. 2024 मध्ये हैदराबादमध्ये सरासरी मासिक कार्यालय भाड्यात 4.4 टक्क्यांनी वाढ होऊन ते प्रति चौरस फूट $0.8 झाले आहे. 2024 मध्ये कोलकातामध्ये सरासरी मासिक कार्यालय भाडे वार्षिक 3.8 टक्क्यांनी वाढून $0.6 प्रति चौरस फूट झाले, असे वेस्टियनच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
नवीन व्यवसायांचा ओघ आणि कंपनीच्या विस्तारामुळे हिंदुस्थानातील कार्यालयीन जागांची मागणी वाढताना दिसत आहे. मुंबईतील बीकेसी आणि दिल्लीचा मध्यवर्ती कनॉट प्लेस आणि लगतचा परिसरात भाडे जास्त आहे. हे भाडे सध्याच्या घडीला सरासरी भाडे दरमहा $3-4 प्रति चौरस फूट इतके आहे.