
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अभिनेता कमाल आर. खान याने आक्षेपार्ह ट्विट केल्यानंतर शिवभक्तांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची गंभीर दखल घेऊन सायबर पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. कमाल खान याने विकीपीडियावरील मजकुरावरून ते ट्विट केल्याचे निदर्शनास आले असून सायबर पोलिसांनी विकीपीडियाला नोटीस बजावली आहे.
कमाल खान याने ‘एक्स’ या सोशल नेटवर्किंग साईटवर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. त्यावरून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सायबर पोलीस विभागाचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांना याप्रकरणी तपासाचे निर्देश दिले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आदर्श आहेत, त्यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह लेखन खपवून घेतले जाणार नाही, विकीपीडियाशी संपर्क साधून त्यावरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासही सायबर विभागाला सांगण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.