
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदनामीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. भिवंडीतील ‘लाईफ इन भिवंडी’ या युट्यूब चॅनलवरील कमेंट बॉक्समध्ये छत्रपतींबद्दल बदनामीकारक व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चुकीची वक्तव्ये करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असून अज्ञात व्यक्तीविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल झाला आहे.
विविध समाजमाध्यमांवर कोणताही अभ्यास नसतानाही अनेकजण इतिहासाचा विपर्यास करून बेधडकपणे विधाने करतात. भिवंडीतील युट्यूब चॅनलवर छत्रपतींबद्दल अपशब्द वापरले असल्याचे अनिल केशरवाणी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या युट्यूब चॅनलवर बंदी आणावी आणि महाराजांची बदनामी करणाऱ्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर शिक्षा करावी, अशी मागणी भिवंडीतील शिवप्रेमींनी केली आहे.