सत्तेसोबत माजही येतो असे म्हटले जाते. अर्थात काही जण याला अपवाद असतात, तर काही निगरगट्ट होतात. महाराष्ट्रात आणि देशभरात सत्तेच्या गैरवापराची अनेक उदाहरण समोर आलेली आहे. आता ओडिशामध्येही एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांचा मुलगा ललित कुमार याने राजभवनातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. रेल्वे स्थानकावरून आणण्यासाठी आलिशान गाडी पाठवली नाही म्हणून ही मारहाण केल्याचा आरोप वैकुंठ प्रधान (वय – 47) यांनी केला.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गेल्या आठवड्यात ओडिशातील पुरी येथे आल्या होत्या. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी पीडित अधिकाऱ्याने वरिष्ठांपासून पोलिसांपर्यंत सर्वत्र पाठपुरावा केला, मात्र त्यांना दाद मिळाली नाही.
राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यानिमित्त वैकुंठ प्रधान यांची राज भवन सचिवालयातील घरगुती विभागात सहायक विभाग अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 7 जुलैला राज्यपालांचा मुलगा ललित कुमार आणि त्याच्यासह इतर पाच जणांनी राज भवनातच मला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, असा आरोप वैकुंठ प्रधान यांनी केला आहे. याची लेखी तक्रार राज्यपालांच्या प्रधान सचिवांना करण्यात आली. मात्र पुढे काहीही कारवाई झालेली नाही. ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे.
काय आहेत आरोप?
वैकुंठ प्रधान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, माझी मुळ पोस्टिंग भुवनेश्वर येथील राजवनात आहे. मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यानिमित्त 5 जुलैपासून पुरी येथील राजभवनात माझी नियुक्ती करण्यात आली. 7 आणि 8 जुलै रोजी राष्ट्रपतींचा दौरा संपन्न झाला. 7 जुलैच्या रात्री पावणे बारा वाजता मी कार्यालयात बसलो असताना राजपालांच्या आचाऱ्याने येऊन सांगितले की, ललित याला तुम्हाला भेटायचे आहे. त्यामुळे मी त्याच्याकडे गेलो. तिथे त्याने मला शिवीगाळ केली. विरोध केला असता त्याने माझ्या कानशिलात लगावली. त्यानंतर मी त्या दालनातून बाहेर पडलो आणि राजभवनातच लपून बसलो. पण ललितच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी मला अडवत, फरफटत पुन्हा त्या दालनात नेले आणि तिथे त्यांनी व ललितने मला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. माझा खून झाला असता तरी मला कुणी वाचवायला आले नसते, असा आरोप वैकुंठ प्रधान यांनी केला.
पत्नीने दिली पोलिसात तक्रार, पण…
दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी प्रधान सचिवांना याची माहिती देण्यात आली. ईमेलद्वारेही सर्व घटनाक्रम कळवण्यात आला. तसेच पोलिसातही तक्रार दाखल करण्यास गेलो, मात्र तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही, असा आरोप पीडिताच्या पत्नी सयोज यांनी केला.
मुलाला सेवा देण्याचा प्रश्नच नाही
माझे पती रुग्णालयात उपचार घेत असून ते राजभवनात राज्यपालांना सेवा देण्यासाठी नियुक्त झालेले आहेत. त्याच्या मुलाला सेवा देण्याचा प्रश्नच नाही. सदर प्रकार आम्ही राज्यपाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही कानावर घातला. मात्र त्यांनी माझ्या पतीचेच कान उपटले. त्यांनी 20 वर्ष हवाई दलात सेवा केली आहे. 2019मध्ये त्यांनी नियुक्ती राजभवनात झाली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.