स्वातंत्र्यदिनानिमित्त आणखी एका राज्याचा मोठा निर्णय; महिलांसाठी Period Leave सुरू

स्वातंत्र्यादिनानिमित्त देशातील एका राज्याने महिलांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाची मासिक पाळीची (Period Leave) रजा सुरू केली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित एका समारंभात ही घोषणा केली आहे.

दरम्यान, ही रजा महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी घेता येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांना त्यांचे आरोग्य अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात मदत करणे हा आहे. ज्या महिला नोकरी करतात त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. मासिक पाळी दरम्यान महिला पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊ शकतात. हा नियम सरकारी आणि खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना लागू असेल, अशी माहिती ओडिशाच्या उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी दिली.

हिंदुस्थानातही महिलांसाठी विशिष्ट रजेची मागणी केली होती. या मुद्द्यावर अनेकदा वादग्रस्त विधानेही करण्यात आली आहेत. नुकतेच स्मृती इराणी यांनी संसदेच याबाबत वक्तव्य केल्याने देशभरात वाद निर्माण झाला होता. महिलांना मासिक पाळी दरम्यान सुट्ट्या देण्यास स्मृती इराणी यांनी विरोध केला होता.

महिलांसाठी मासिक पाळीची रजा का आहे महत्त्वाची –
मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिकबाब आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. वैद्यकिय शास्त्रानुसार मासिक पाळी दरम्यान महिलांमध्ये अनेक बदल होत असतात. हे बदल केवळ शारीरिक नसून मानसिकही आहेत. महिलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो आणि मनःस्थिती उदास राहते. पोट आणि पाठदुखी कायम राहते. थकवा आणि अशक्तपणा कायम राहतो. त्यामुळे या काळात महिलांना विश्रांतीची गरज असते.

हिंदुस्थानात मासिक पाळीच्या रजेबाबत कोणताही केंद्रीय कायदा किंवा धोरण नाही. 2020 मध्ये झोमॅटोने महिलांच्या मासिक पाळीच्या कालावधीची रजा जाहीर केली होती. झोमॅटो दरवर्षी 10 दिवसांची सशुल्क रजा देते. Zomato नंतर, इतर अनेक स्टार्टअप्स कंपन्यांनी अशा सुट्ट्या देण्यास सुरुवात केली. बिहार, केरळ आणि सिक्कीम या भारतातील फक्त तीन राज्यांमध्ये मासिक पाळीसाठी रजेचे नियम आहेत.