कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर बीफ खाल्याचा आरोप; 7 विद्यार्थ्यांचे निलंबन

ओडिशातील बेरहामपूर येथील सरकारी महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांनी गोमांस शिजवून खाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वसतिगृहातील 7 विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच या विद्यार्थ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. याशिवाय एका विद्यार्थ्याला दंडही ठोठावण्यात आला आहे. या घटनेमुळे महाविद्यालयात तणावाचे वातावरण आहे. या घटनेबाबत पोलीस आता अधिक सतर्क झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण परला महाविद्यालयातील आहे. यासंदर्भात कॉलेजच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी  अधिसूचना जारी केली आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना बंदी घातलेल्या गोष्टी केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या नियमांविरुद्ध जाऊन विद्यार्थ्यांनी हे कृत्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते यावेळी म्हणाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिष्कृत विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला 2 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणाबाबत बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनीही कॉलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या इतर सर्व विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. वसतिगृहात गोमांस शिजवण्याच्या घटनेने अशांतता आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे. याचा इतर विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे संपूर्तण महाविद्यालयाच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी. असे या तक्रारीत म्हटले आहे.