शार्कच्या पाठीवर ऑक्टोपसची सफर

प्राणी अनेकदा एकत्र प्रवास करतात. या एकत्र प्रवासाचा त्यांना फायदा होतो. नुकतेच शास्त्रज्ञांना प्राण्यांची एक विचित्र जोडी एकत्र प्रवास करताना दिसली. न्यूझीलंडच्या किनाऱ्याजवळ एका अतिवेगवान शार्कच्या पाठीवर बसून प्रवास करताना चक्क ऑक्टोपस दिसला. हे अद्भुत दृश्य शास्त्रज्ञांनी कॅमेऱ्यात कैद केले. न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडजवळील हौराकी गल्फमध्ये समुद्र संशोधन करताना हा दुर्मीळ क्षण अनुभवता आला.

10 फूट लांबीच्या शार्कच्या डोक्यावर एक नारिंगी ठिपका दिसत होता. संशोधकांना सुरुवातीला वाटलं की, शार्कच्या डोक्यावर कसली तरी खूण किंवा दुखापत झालेय की काय? संशोधकांच्या टीमने जहाजातून त्वरित ड्रोन सोडला आणि कॅमेरा पाण्यात खाली नेला. सागरी पर्यावरणशास्त्रज्ञ रोशेल कॉन्स्टँटाईन म्हणाले की, कॅमेऱ्यातून आम्हाला जे दिसले ते अविस्मरणीय होते. शार्कच्या डोक्यावर माओरी ऑक्टोपस होता. माओरी ऑक्टोपस ही प्रजाती 6.5 फूट रुंदीपर्यंत वाढणारी 26 पौंड वजनाची असते.