पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या पाचही शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या प्रांगणात ‘महासागर’ या विषयावर दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित केले आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या मुंबई विभागाच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सोनिया सुकुमारन यांच्या हस्ते शनिवारी या प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली, असे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या मुख्य समन्वयक जान्हवी खांडेकर यांनी सांगितले.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनतर्फे दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी भव्य प्रदर्शन भरवण्यात येते. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. प्रदर्शनात आकर्षक शीर्षकाची विविध दालने आहेत. वैशिष्टय़पूर्ण मांडणीतून दर्शकांना जणू काही सागराच्या आत शिरल्याचा आभास निर्माण होतो. विविध माडेल्सच्या साहाय्याने महासागरांची रचना, वैशिष्टय़े, त्यातील जीवसृष्टी, जलमार्ग, व्यावसायिक उपयोग, नवीन संशोधन, समुद्रयान मिशन, करियरच्या संधी अशा सर्व बाजूंनी महासागर या विषयाची समग्र माहिती या प्रदर्शनातून मिळेल.