मिंधेंनी घातला नेरुळमधील नवरात्रोत्सवात खोडा; 14 वर्षांची परंपरा खंडित, भाविकांमध्ये संताप

प्रातिनिधिक फोटो

मिंधे गटाने खोडा घातल्यामुळे नेरुळमधील नवरात्रोत्सवाची गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा खंडित केली आहे. नेरुळ आणि परिसरात सर्वाधिक गर्दी खेचणारा उत्सव म्हणून या नवरात्रोत्सवाची ओळख आहे. मात्र मिंधे गटाच्या आडमुठेपणामुळे यंदा हा नवरात्रोत्सव साजरा होणार नसल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नेरुळ येथील सेक्टर 16 आणि 18 च्या चौकातून गेल्या 14 वर्षांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सावाचे आयोजन केले जात आहे. यंदाही मंडळाने आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेतल्या होत्या. मात्र मिंधे गटाचे शहरप्रमुख विजय माने यांनी या उत्सवात खोडा घातला. त्यामुळे पोलीस आणि नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सर्व परवानग्या असतानाही व्यासपीठाचे काम बंद पाडले. याप्रकरणी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, सुमित्र कडू, शहरप्रमुख काशिनाथ पवार, मंडळाचे अध्यक्ष सतीश रामाणे, उपशहरप्रमुख तानाजी जाधव, समीर बागवान यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र मिंधे गटाच्या दबावामुळे पोलिसांनी या उत्सवाला परवानगी नाकारली.

मिंधेंच्या राजकारणाचा स्तर घसरला

सत्तेच्या मस्तीत मस्तवाल झालेल्या मिंधे गटाचा राजकारणाचा स्तर घसरला आहे. पालिका आणि पोलीस प्रशासन मिंधे गटाच्या इशाऱ्यावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देत आहे. आता त्यांनी पारंपरिक उत्सवातही खोडा घालण्यास सुरुवात केली आहे. विजय नाहटा यांच्या इशाऱ्यावरून सानपाडा येथील शिवजयंती आणि दहीहंडी उत्सवात आडकाठी आणण्यात आली होती. आता नेरुळमधील हा उत्सवही नाहटा यांच्यामुळेच बंद झाला आहे, असा आरोप जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केला आहे.