ओबीसी आरक्षणाच्या समर्थनासाठी बेमुदत उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांची तब्येत खालावली आहे. मात्र या दोघांनीही उपचार घेण्यास नकार दिल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांशी पह्नवरून संवाद साधला असून मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट केले आहे. परंतु उपोषणकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी आश्वासनाची मागणी केली आहे.
वडीगोद्री येथे गेल्या चार दिवसांपासून ओबीसी बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सरकारचा साधा प्रतिनिधीही उपोषणाकडे फिरकला नाही. जिल्हा प्रशासनानेही या उपोषणाची दखल घेतली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांची तब्येत बिघडली आहे. गोंदी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बिराजदार यांनी दोघांची तपासणी करून उपचार घेण्याची विनंती केली. परंतु त्याला हाके आणि वाघमारे यांनी नकार दिला.
लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरू राहणार
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, परंतु हे आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची हमी सरकारने द्यावी, असे लक्ष्मण हाके म्हणाले. सग्यासोयऱयांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करताना ओबीसी आरक्षण अडचणीत येत नाही हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समजून सांगावे. ओबीसी आरक्षणाला संपूर्ण संरक्षण देण्याची लेखी हमी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून मिळत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही, असेही हाके यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांचा पह्न हे नाटक असल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला. ओबीसींबद्दल त्यांना थोडीशीही आस्था असती तर प्रशासनाने आतापर्यंत या उपोषणाची दखल घेतली असती, असे वाघमारे म्हणाले.
सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश काढणाऱयांचे उमेदवार पाडू
ओबीसी आरक्षणाला जो विरोध करेल आणि सग्यासोयऱयांचा अध्यादेश काढेल त्यांचे आमदार येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही पाडू, असा स्पष्ट इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणावरही टीका केली. या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटेल, असेही ते म्हणाले.