ओबीसी बचाव आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ ओबीसी कार्यकर्त्यांनी मराठवाड्यात ठिकठिकाणी उग्र आंदोलन केले. काही ठिकाणी टायर पेटवण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
वडीगोद्री येथे ओबीसी बचाव आंदोलन सुरू असून प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषण सुरू होऊन सात दिवस उलटले तरी सरकारला लक्ष देण्यास वेळ नसल्यामुळे संतप्त ओबीसी कार्यकर्त्यांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. यावेळी टायर जाळून ढिम्म सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यकर्ते प्रचंड आक्रमक असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला होता.
गंगाखेडमध्ये तहसीलसमोर निदर्शने
वडीगोद्रीत सुरू असलेले ओबीसींचे उपोषण सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी गंगाखेडमध्ये तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात गोविंद यादव, गोविंद लटपटे, साधना राठोड, जनार्दन परकड, गोविंद मानवतकर, नारायण घनवटे, प्रदीप मुंडे, राहुल फड, बालासाहेब यादव, सागर गोरे, हनुमान देवकते, मनोज मुरकुटे, माधवराव चव्हाण, सुभाषराव भोकरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
धाराशिव येथे लाक्षणिक उपोषण
ओबीसी आरक्षण बचावसाठी बेमुदत उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना समर्थन देण्यासाठी धाराशिव येथे बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या उपोषणात सचिन शेंडगे, अप्पासाहेब पाटील, अरुण जाधवर, पांडुरंग लाटे, रमाकांत लकडे, दिलीप म्हेत्रे, नागनाथ बोरगावकर आदी सहभागी झाले होते.
नायगाव बाजारला ओबीसींचे उपोषण
वडीगोद्री येथील प्रा. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नायगाव बाजार येथे तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या उपोषणात सूर्यकांत सोनखेडकर, विठ्ठल बेळगे, देविदास बोमनाळे, प्रभाकर लखपत्रेवार, गोविंद नरसीकर, निळकंठ तकबीडकर, माधव चितले, साईनाथ जिगळेकर, विकास भुरे, संभाजी खडके, राजू बेळगे, गणेश कंदुर्गे, सुभाष चुट्टेवाड, माधव कोरे, रामकिशन पालनवार आदींनी सहभाग नोंदवला.
चितेवर बसून उपोषण करणार
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये, सगेसोयर्यांचा अध्यादेश रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी भोकरमध्ये गुरुवारी चितेवर बसून उपोषण करण्याचा इशारा संजय दिगंबर गौड यांनी दिला.
चाकूरात प्रा. हाकेंना पाठिंबा
ओबीसींच्या हक्कासाठी उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील रोहिणा येथे बुधवारपासून विठ्ठल मंदिरासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर माधव भिंगोले, सुरेश मुंढे, मच्छिंद्र नागरगोजे, अशोक केंद्रे, शामराव केंद्रे, राम भंगे, गणेश म्हेत्रे, शिवाजी डिगोळे, पंडित केंद्रे, रमेश मुंढे, वैजनाथ जिवनगे, नंदकुमार केंद्रे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.