येत्या 22 तारखेपासून ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रा; अंबड तालुक्यातील दोदडगावापासून सुरुवात

येत्या 22 तारखेपासून ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रा निघणार असून, याची सुरुवात अंबड तालुक्यातील दोदडगावापासून होणार असल्याची माहिती आज जालन्यात आयोजित ओबीसीबांधवांच्या बैठकीत देण्यात आली.

शनिवारी जालना येथे ओबीसीबांधवांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस ओबीसी नेते नवनाथ वाघमारे व अशोकअण्णा पांगारकर यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की, येत्या 22 तारखेपासून ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रा ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात निघणार आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील दोदडगाव याठिकाणाहून ही यात्रा सुरू, होणार असून, जवळची गावे करून बीडमध्ये यात्रा प्रवेश करणार आहे. नंतर अहिल्यादेवीनगर, परभणी, हिंगोली, वाशीम, बुलडाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील पैठणमध्ये या यात्रेची सांगता होईल. दरम्यान, पाच दिवसांची ही यात्रा असून, ओबीसीबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नवनाथ वाघमारे यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांना संविधान आणि मंडल आयोगावर अभ्यास नसून, ते कधी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही असे बोलतात तर कधी ओबीसीच्या 80 टक्के आरक्षणामध्ये आम्ही घुसलो आहोत, असे बोलतात. मुख्यमंत्र्यांनी लेखीहमी द्यायला हवी की, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही. आजपर्यंत जे 57 लाख कुणबी प्रमाणपत्र सरकारने वाटप केले आहे ते बोगस असून हे सरकारचे पाप असल्याचे नवनाथ वाघमारे म्हणाले.

नवनाथ वाघमारे म्हणाले की, राज्य सरकार आणि मराठा समाजातील प्रस्थापित नेते मंडळी मागील नऊ-दहा महिन्यांपासून जरांगे पाटलांचे अति लाड करत आहे. यांच्या जिवावर जरांगे हट्ट करत आहे आणि राज्य सरकारसुद्धा त्यांचे हट्ट पुरवत आहे. परंतु जरांगेंच्या हट्टापायी ओबीसी समाजावर अन्याय होत असेल किंवा ओबीसी समाजाविरोधात कटकारस्थान करणारे असो किंवा ओबीसी समाजाच्या पाठीत खंजिर खुपसणारे असो येणार्‍या काळात ओबीसी, एससी, एसटी सर्व मिळून मोठा लढा उभारल्या जाईल. मग सरकार असो की, विरोधक असो त्यांना आपली जागा दाखवली जाईल, असे नवनाथ वाघमारे म्हणाले.

महाराष्ट्रातील 288 जागा आम्ही पाडू जरांगे पाटलांच्या या वक्तव्यावर नवनाथ वाघमारे म्हणाले की, आपण जरांगे पाटलांच्या या वक्तव्याचे स्वागत करतो. त्यांनी खरोखरच महाराष्ट्रातील 288 जागा पाडल्या पाहिजे आणि आपल्या शब्दावर त्यांनी ठाम राहिले पाहिजे. नाहीतर तेच 288 निवडून आणण्यासाठी जरांगे पाटलांनी रात्रंदिवस एक करू नये. जर 288पडले तर ते प्रस्थापितच आहेत. यावेळी नवनाथ वाघमारे, अशोकअण्णा पांगारकर, दीपक बोराडे यांच्यासह ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.