
अमेरिकेचा जगप्रसिद्ध गोल्फ खेळाडू टायगर वूड्स या नावाला खरं तर ओळखीची गरजच नाही. दोन वर्षाचा असल्यापासून, टायगरने गोल्फ खेळण्यास सुरुवात केली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या टायगरने आत्तापर्यंत ९७ वेळा विजेतेपद पटकावले आहे. येत्या काही काळात टायगर वुड्सवर आधारीत एका चरित्रपटाची निर्मिती होणार आहे. हा चरित्रपट वुड्सच्या ‘टायगर स्लॅम’ या पुस्तकावर केंद्रित असणार आहे.
सदर चरित्रपटांतर्गत वुड्सचा बालपणापासून ते प्रतिभावान खेळाडू बनण्यापर्यंतचा प्रवास चित्रित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने त्याने जिंकलेल्या चार प्रमुख चॅम्पियनशिपवर भर देण्यात येणार आहे. हा चित्रपट केव्हिन कुकच्या पुस्तकावर आधारित असणार आहे. ‘टायगर स्लॅम’ या पुस्तकामध्ये यावरच आधारीत लिखाण झालेले आहे. सदर चित्रपटामध्ये वुड्सच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मात्र कुठलेच भाष्य करण्यात येणार नाही.
चित्रपटामध्ये केवळ वुड्सची कारकिर्द आणि त्याचे वलय यावरच आधारलेला असणार आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटकांना वगळून हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. चरित्रपट कधी येईल याबाबत अजून कोणतीही खात्रीशीर माहिती नाही. परंतु हा चित्रपट अॅमेझॉन एमजीएमवर दाखवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. दिग्दर्शक ग्रीन हे या बायोपिकचे दिग्दर्शन करणार असून, या चित्रपटाच्या निर्मितीसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा पुढे सरसावले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या, हायर ग्राउंड प्रॉडक्शन्स द्वारे या प्रकल्पात सामील होण्यासाठी सध्याच्या घडीला चर्चा करत आहेत.