न्यूझीलंडचे फिट्टमफाट, फिलीप्सनं 4 चेंडूत 3 विकेट्स घेत श्रीलंकेच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला

पावसाच्या व्यत्ययामुळे कमी धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात श्रीलंकेला शेवटच्या पाच चेंडूंत विजयासाठी केवळ 7 धावांची गरज होती आणि सलामीवीर पथुम निसांकाच्या हातात बॅट होती. पण तेव्हाच ग्लेन फिलीप्सच्या फिरकीने कमाल करत चार चेंडूंत 3 विकेट टिपत श्रीलंकेच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने जिंकला होता तर दुसरा न्यूझीलंडने 5 धावांनी जिंकत मालिकी बरोबरीत सोडवली.

वानिंदु हसरंगा आणि मथीशा पथिराना यांच्या मार्यापुढे न्यूझीलंडची फलंदाजी 108 ढेपाळली. 109 धावांचा पाठलाग करताना लॉकी फर्ग्युसनने कुसल परेरा (3), कामिंदु मेंडिस (1) आणि चरिथ असलंका (0) या तिघांना सलग चेंडूवर बाद करत आपली पहिली हॅटट्रिक घेत श्रीलंकेला हादरवले. त्यानंतर सलामीवीर पथुम निसांकाने झुंजार फलंदाजी करत श्रीलंकेला विजयासमीप नेले. पण विजयाच्या उंबरठयावर असताना श्रीलंकेला ठेच लागली. 6 चेंडूंत 8 धावांची गरज असताना फिलीप्सच्या चेंडूने आधी निसांका आणि त्यानंतर तीक्षणा आणि तुषारचे विकेट घेत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडचा पाचवा हॅटट्रिकवीर गोलंदाज असलेला फर्ग्युसन सामनावीर ठरला.

मिचेल हेचा पदार्पणात विश्वविक्रम

यष्टिरक्षक मिचेल हेने आपल्या पहिल्याच टी-20 सामन्यात यष्टिमागे सहा विकेट घेण्याचा विश्वविक्रम रचला. त्याने पाच झेल आणि एक यष्टिचीत करत हा पराक्रम केला. टी-20 च्या इतिहासात 6 विकेट आणि तेसुद्धा पदार्पणातच असा दुर्मिळ विश्वविक्रम हेच्या नावावर लिहिला गेला.