बाथरूममधल्या पाण्यापासून बनवले जातेय अन्न, नोएडा स्टेडियमधील किळसवाणा प्रकार उघड

न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना ग्रेटर नोएडा स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता, मात्र तेथील वातावरणामुळे हा सामना रद्द करण्यात आला. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मैदानाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी वैतागले आहेत. अशातच आता एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायकल होत आहे. यात नोएडाच्या स्टेडीयम मधील स्वयंपाक घरात वॉशरूमच्या पाण्याच्या वापर केला जात आहे. त्यामुळे लोकांकडून संताप होत आहे.

नोएडाच्या स्टेडिअम मधील स्वयंपाक घरातील किळसवाणा व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वयंपाकी बाथरूममधून पाणी घेताना दिसत आहे. तेच पाणी जेवणासाठी वापरले जात असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. या व्हिडीओवर प्रचंड संतप्त प्रक्रिया येत आहेत.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच मैदानाच्या सुविधांबाबत आक्षेप घेतला होता. आता एसीबीच्या एका अधिकाऱ्याने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘येथे उत्तम सुविधा नावाची कोणतीही गोष्ट नाही. आम्हाला पुन्हा इथे यायला आवडणार नाही. त्याऐवजी आम्ही लखनौच्या मैदानाला प्राधान्य देऊ’, असे एसीबीचे अधिकारी यावेळी म्हणाले. तसेच अधिकाऱ्याने मैदानात सामान्य सुविधाही उपलब्ध नसल्याचे सांगितले.

गेल्या 10 दिवसांपासून उत्तर हिंदुस्थानात सतत पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत ग्रेटर नोएडाचे मैदान संपूर्णपणे खराब झाले आहे. मैदान ओले असल्याने पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवसाच्या आदल्या रात्री पुन्हा मुसळधार पाऊस पडला. मात्र या मैदानातील व्यवस्थापनाने याबाबत गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे मैदान अजूनही ओलेच आहे. म्हणून दुसऱ्या दिवशीही सामना रद्द करण्याची वेळ आली आहे.