डहाणूमध्ये पोषण आहाराला पाय फुटले , प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना झाली ‘अशक्त’

प्रातिनिधिक फोटो

विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना सुरू करण्यात आली. पण ही योजनाच आता ‘अशक्त’ झाल्याचे दिसून आले आहे. डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेले 800 किलो धान्यच गायब झाल्याचे तपासणीत उघड झाले आहे. पंतप्रधानांच्या नावाने सुरू झालेल्या या पोषण आहाराला पाय फुटले असून हे धान्य नेमके कोणी गायब केले, ते काळ्या बाजारात तर विकले नाही ना असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून या बनवाबनवीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.

डहाणू तालुक्यात एकूण 493 शाळा असून तेथे 50 हजार 152 विद्यार्थ्यांना दरमहा अडीच किलो धान्य पुरवण्यात येते. प्रत्येक शाळेला जेवढे धान्य मिळते त्याचा साठा बुकमध्ये नोंदणी करावा लागतो. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी डहाणूतील प्रसिद्ध पोंदा हायस्कूलमध्ये जाऊन पोषण आहाराची तपासणी केली तेव्हा अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. धान्याच्या कोठारातील घान्याची मोजणी केली असता 800 किलो धान्याचा साठा कमी आढळून आला. नोंदवही तपासली तेव्हाही ही तफावत दिसून आली. विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळवणाऱ्यांचा सध्या शोध सुरू आहे.

■ प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शंभर ग्रॅम व पाचवी ते आठवीच्या मुलांना दीडशे ग्रॅम धान्य शिजवून द्यावे असा नियम आहे. पण ए. एल. पोंदा विद्यालयात मात्र हा साठा कमी दिसून आला.
■ रोज 70 ते 80 किलो धान्य विद्यार्थ्यांना शिजवून देणे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात फक्त 30 ते 40 किलोच तांदूळ शिजवला जात असल्याचे तपासणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
■ पोंदा विद्यालयाला जळगावच्या साई फेडरेशन या संस्थेमार्फत धान्याचा पुरवठा केला जातो. त्यानंतर हे धान्य व्यवस्थित नोद करून गोदामात पाठवले जाते व नंतर प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही विभागांना त्याचा पुरवठा करण्यात येतो.

मुख्याध्यापकांची उडवाउडवीची उत्तरे

के.एल. पोंदा विद्यालयात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत तब्बल 800 किलो धान्य गायब असल्याचे दिसून आले. याबाबत मुख्याध्यापक सोपान इंगळे यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शाळेतील धान्याच्या नोंदी व्यवस्थित असून त्यात कुठेही तफावत नसल्याची सारवासारव करण्यात आली. पोषण आहाराच्या दोन वेळा नोंदी झाल्यामुळे हा फरक असल्याचे तारेदेखील मुख्याध्यापकांनी तोडले.

शिक्षण विभागाची नोटीस

पोषण आहाराला पाय फुटून ते गायब झाल्याने शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना नोटीस बजावली आहे. त्या नोटिसीला काय उत्तर मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांनीदेखील केली आहे.

पंचायत समितीला अहवाल दिला का?

धान्य योग्य प्रमाणात शिजवले जाते की नाही याची पाहणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत केली जाते. संबंधित शाळांमधील धान्याच्या नोंदी केंद्रप्रमुखांनी करून तसा अहवाल पंचायत समितीला द्यावा लागतो. मात्र के. एल. पोंदा या शाळेने असा अहवाल दिला की नाही हे गुलदस्त्यात आहे.