गुंतवणुकीत महिलांची ‘मनी पॉवर’, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यात महिला पुरुषांच्या पुढे

पैशांची बचत करण्यामध्ये महिला या नेहमीच पुरुषांपेक्षा पुढे असतात. बचतीसोबत आता म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्येही महिला पुढे गेल्या असून पुरुषांच्या तुलनेत महिलांनी म्युच्युअल फंडात जास्त गुंतवणूक केली आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. एकूण गुंतवणूकदारांमध्ये महिलांचा वाटा एक चतुर्थांश म्हणजेच 25 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ आणि ‘सीआरआयएसआयएल’च्या अहवालात म्हटले आहे.

महिला गुंतवणूकदारांची मालमत्ता व्यवस्थापनाखालील रक्कम (एयूएम) मार्च 2019 मध्ये 4.59 लाख कोटी रुपये होती. ती मार्च 2024 मध्ये दुप्पट वाढून 11.25 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. महिला गुंतवणूकदारांमध्ये ब्रोकरच्या मदतीशिवाय थेट गुंतवणूक करण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. तरुण महिला गुंतवणूकदारांमध्ये हा ट्रेंड सर्वात वेगवान आहे. म्युच्युअल फंडांमध्ये महिलांची गुंतवणूक 11 लाख कोटी रुपये आहे.

म्युच्युअल फंडात महिलांची गुंतवणूक

  • 25 वर्षांखालील 1.6 टक्के
  • 25 ते 44 वर्षे 28.4 टक्के
  • 45 ते 58 वर्षे 30.1 टक्के
  • 58 वर्षांपेक्षा जास्त 37.5 टक्के

महिला गुंतवणूकदारांच्या एसआयपी खात्यांमध्ये डिसेंबर 2020 मध्ये 71.13 लाखांची वाढ झाली, जी डिसेंबर 2024 मध्ये 2.63 कोटी झाली. म्हणजेच खात्यांमध्ये 270 टक्के वाढ झाली. मार्च 2024 मध्ये महिलांच्या एकूण गुंतवणुकीपैकी 30 टक्क्यांपेक्षा जास्त एसआयपीचा वाटा होता. मार्च 2019 ते मार्च 2024 दरम्यान त्यात 319 टक्के वाढ झाली. 2019 मध्ये महिला गुंतवणूकदारांच्या एकूण गुंतवणुकीत 5 वर्षांपेक्षा जास्त काळाच्या होल्डिंग्जचा वाटा 8 टक्के होता, जो मार्च 2024 मध्ये 21 टक्क्यापर्यंत वाढला. या काळात पुरुष गुंतवणूकदारांची गुंतवणूक 8 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढली.