
मुंबईत रात्री-अपरात्री त्रासदायक ठरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी मुंबई महापालिकेने राबवलेल्या निर्बिजीकरण मोहिमेमुळे भटक्या कुत्र्यांची सरासरी संख्या गेल्या दहा वर्षांत 5 हजारांनी कमी झाली आहे, मात्र घाटकोपर, मुलुंड, भायखळा आणि कांदिवलीत ही संख्या वाढली आहे तर डी विभागात येणाऱ्या ग्रँट रोड, मलबार हिल परिसरात कुत्र्यांची संख्या स्थिर राहिली आहे. दरम्यान, गेल्या दहा वर्षांत कुत्र्यांशी संबंधित तक्रारी आणि त्यांच्याकडून चावा घेण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल-इंडिया या संस्थेने 2014 ते 2024 या दहा वर्षांत केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार, संस्थेने 2012-13 मध्ये मुंबई शहर आणि उपनगरातील भटक्या कुत्र्यांचे बेसलाइन सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली. त्यात 95 हजार 172 कुत्र्यांची संख्या किंवा अंदाजे 10.54 कुत्रे प्रति किमी असा अंदाज गृहित धरला होता, त्यानुसार ही संख्या कमी होऊन 90 हजारांवर आली आहे.