आता मंगळसूत्रही गहाण ठेवण्याची वेळ येईल, मोदी है, तो मुमकिन है! सोने तारण कर्जदार वाढल्याने काँग्रेसचा निशाणा

सोने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्यांची संख्या 2025 या वर्षात झपाट्याने वाढली आहे. सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत 87 टक्क्यांची वाढ झाली आहे. 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत बँकांनी वितरित केलेल्या सुवर्ण कर्जात 87.4 टक्क्यांचीवाढ झाली आहे. आता ती 1.91 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या सद्यस्थितीवर काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. ही आखडेवारी देशातील बिकट परिस्थिती दर्शवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देशात सुवर्ण कर्जाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. RBI च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2025 मध्ये सोन्याच्या दागिन्यांवर दिलेल्या कर्जात मोठी वाढ झाली आहे. 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत, बँकांनी वितरित केलेल्या सुवर्ण कर्जात 87.4 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. वैयक्तिक कर्ज श्रेणीमध्ये ही वाढ सर्वात जलद आहे. एक वर्षापूर्वी 23 फेब्रुवारी 2024 रोजी हा आकडा 1.02 लाख कोटी रुपये होता आणि त्याचा विकास दर देखील फक्त 15.2 टक्के होता. आरबीआयच्या मते वैयक्तिक कर्जांमध्ये एकूण वाढ 19 टक्के होती, परंतु सोन्याच्या दागिन्यांवर घेतलेल्या कर्जांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. आर्थिक दबावामुळे किंवा रोख रकमेच्या तात्काळ गरजेमुळे लोक मोठ्या प्रमाणात सोने गहाण ठेवून कर्ज घेत आहेत.

सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सोन्याच्या कर्जात वाढ झाली आहे. अनेक आर्थिक ताणामुळे सोन्याच्या कर्जावरील अवलंबित्व वाढले आहे. ग्राहकांना त्यांचे दागिने गहाण ठेवून अधिक कर्ज मिळत आहे. यामुळे असुरक्षित वैयक्तिक कर्जांच्या मागणीत घट झाली आहे. सप्टेंबर 2024 पासून बँकांच्या सुवर्ण कर्जात 50 टक्के वाढ झाली आहे. जी एकूण कर्ज वाढीपेक्षा खूपच जास्त आहे.

या मुद्द्यावर काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या परिस्थितीबाबत जनतेची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे दिसत आहे. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जनतेला सोने गाहण ठेवत कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे गेल्या काही काळा सोने गहाण ठेवत कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी म्हटले आहे. देशातील ही परिस्थती गंभीर आहे. आता जनता गरजांसाठी सोने गहाण ठेवत आहे. हे असेच सुरू राहिले तर मंगळसूत्रही गहाण ठेवण्याची वेळ येईल, मोदी है तो मुमकिन है. भाजपच्या सत्ताकाळात हे शक्य आहे, अशा शब्दांत सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.