रशियाच्या जैविक आणि रासायनिक सुरक्षा दलाचे तसेच अण्वस्त्रप्रमुख लेफ्टनंट जनरल ईगोर किरीलोव्ह यांचा आज बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मॉस्को येथे ही घटना घडली. किरीलोव्ह आपल्या अपार्टमेंटमधून बाहेर पडत असताना स्कूटरमधील बॉम्बचा स्फोट झाला. यात त्यांचा आणि त्यांच्या सहाय्यकाचाही मृत्यू झाला. युक्रेनमधील त्यांच्या भूमिकेसाठी ब्रिटन आणि कॅनडाने त्यांच्यावर निर्बंध लादल्यानंतर युक्रेनच्या सुरक्षा दलाने त्यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर ते बॉम्बस्फोटात मारले गेल्याचा दावा रशियाने केला आहे.
रशियन तपास संस्थांनी पुढील तपास सुरू केला आहे. किरीलोव्ह यांच्या हत्येचा तपास सुरू केल्याप्रकरणी रशियाच्या तपास संस्थेने एक निवेदन जारी केले आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार स्फोटासाठी 200 ग्रॅम टीएनटीचा वापर करण्यात आला होता. रशियाने युद्धात फेब्रुवारी 2022 पासून तब्बल 4 हजार 800 वेळा रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याचा दावा युक्रेनच्या सुरक्षा दलाने तसेच तपास यंत्रणांनी केला आहे. दरम्यान, युद्धात रासायनिक शस्त्रे वापरल्याचा दावा रशियाने फेटाळला आहे.
पुतीन यांना जबर धक्का
युक्रेनने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या माध्यमातून रशियावर हल्ला केल्यामुळे पुतीन प्रचंड चिडले होते. त्यांनी अण्वस्त्र हल्ला करण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त होते. अशातच रशियाची जगाला हादरवून सोडण्याची ताकद असलेली अण्वस्त्र शक्ती ज्या व्यक्तीच्या सुरक्षेत होती त्याचीच हत्या करण्यात आल्याने पुतीन यांना जबर धक्का बसल्याचे वृत्त आहे. हत्येनंतर रशियन वृत्तवाहिन्यांवर याबाबतची दृष्ये दाखवली गेली.
झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्यासोबत चर्चा करावी
गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. या युद्धामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले असून झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे अत्यंत दुःखी आहे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच हे युद्ध थांबवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्याशी करार करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी तयार राहा, असे आवाहन ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांना केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संघर्षात विराम येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सर्व ठीक करण्यासाठी 100 वर्षे लागतील
युद्धामुळे सगळीकडे इमारतींचे, घरांचे फक्त ढिगारे दिसत आहेत. सगळीकडे विध्वंसच असून हे सर्व ठीक करण्यासाठी तब्बल 100 वर्षांहून अधिक काळ लागेल, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. एक तरी इमारत वाचली आहे असे कोणतेच शहर नाही, सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे असेही ते म्हणाले.