संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. पहिल्याच दिवशी नीट (NEET) परीक्षेवरुन प्रचंड गदारोळ पहायला मिळाला. नीट पेपरफुटी प्रकरणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI)ने संसदेबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. NTA आणि शिक्षणमंत्र्यांविरोधात NSUI च्या कार्यकर्त्यांचे संसदेबाहेर आंदोलन सुरु आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्ते करत आहेत. पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. NSUI अध्यक्ष वरुण चौधरी यांच्या नेतृत्वात हे कार्यकर्त्यांचे हे आंदोलन सुरू आहे. लोकसभा सत्रातही नीटवरुन गदारोळ पहायला मिळाला. नीट परीक्षेतील गोंधळाविरोधात घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान खासदारकीची शपथ घेण्यासाठी उठताच विरोधी पक्षांनी घोषणा देण्यास सुरवात केली.
विद्यार्थ्यांचा संसदेला घेराव
काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने बॅनरबाजी करत संसदेला घेराव घातला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी संसदेबाहेर मोठा पोलीस फौजफाटा उपस्थित आहे. मात्र परिस्थिती नियंत्रण आणणे पोलिसांना कठिण झाल्याचं पहायला मिळालं. चारही बाजूंनी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत, मात्र आंदोलनकर्ते बॅरिकेड्सवर चढून दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करतानाचं चित्र पाहायला मिळालं.
पेपरफुटी प्रकरणी सीबीयकडून कसून तपास सुरू
नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले आहेत. पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी अटकसत्र सुरु करत अनेक राज्यातून काही लोकांना अटक केली आहे. देशभरात माजलेली खळबळ पाहता केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. सीबीआयकडून प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. सीबीआयच्या तपासात पेपरफुटी प्रकरणात मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.