
आधार कार्ड हे देशातील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. विमानतळ, हॉटेल किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी व्हेरिफिकेशन करताना आधार कार्ड किंवा त्याची झेरॉक्स दाखवावी लागते. मात्र यापुढे त्याची गरज पडणार नाही. कारण केंद्र सरकार डिजिटल सोयीसाठी आणि गोपनीयतेसाठी मोठं पाऊल टाकत नवीन आधार मोबाईल ऍप लवकरच लाँच करणार आहे. या ऍपमुळे नागरिकांना ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड जवळ ठेवायची गरज पडणार नाही. तसेच फोटो कॉपी देण्याची गरजही पडणार नाही.
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात नवीन आधार ऍपची माहिती दिली. आधार ऑथेंटिकेशनसाठी नवीन ऍप लाँच झाल्यानंतर, युजर्सना हॉटेलपासून विमानतळापर्यंत कुठेही आधार कार्ड किंवा त्याची प्रत घेऊन जाण्याची आवश्यकता राहणार नाही, असे अश्विनी वैष्णव म्हणाले. हे ऍप सध्या बीटा व्हर्जनमध्ये आहे आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया त्याची चाचणी करत आहे. चाचणी यशस्वी पूर्ण झाल्यानंतर आधारचे नवीन ऍप लवकरच नागरिकांसाठी लाँच केले जाईल, असे वैष्णव यांनी सांगितले.
‘यूपीआय’सारखे एकदम सोपे
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये हे नवीन आधार ऍप कसे काम करते, त्याबद्दल दाखवले आहे. नवे ऍप ‘यूपीआय’सारखे खूप सोपे आणि युजर फ्रेंडली असेल, असे त्यांनी सांगितले. यासोबत त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. नवीन आधार ऍप, फेस आयडी ऑथेंटिकेशन व्हाया मोबाईल ऍप. नो फिजिकल कार्ड, नो फोटोकॉपी.
क्युआर कोड आणि फेस आयडेंटीफिकेशन
नवीन आधार ऍपद्वारे फेस आयडी आणि क्यूआर स्कॅनिंगद्वारे डिजिटल पडताळणी केली जाईल. प्रथम एक क्युआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर ऍपवर सेल्फी कॅमेऱयाद्वारे तुमच्या चेहऱयाची पडताळणी होईल. या ऑथेंटिकेशनमध्ये फक्त आवश्यक असलेले मूलभूत तपशील शेअर केले जातील. युजर्सच्या परवानगीशिवाय डेटा शेअर केला जाणार नाही, (प्रायव्हसी) गोपनीयता वाढेल.
आता व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंटच्या फोटोकॉपीची गरज लागणार नाही.
हॉटेल्स आणि विमानतळांवर फोटोकॉपी देण्याची आवश्यकता राहणार नाही. नवीन आधार ऍपसह फसवणूक किंवा एडिटिंगला काहीच वाव उरणार नाही.