घरी किंवा ऑफिसात तुम्ही लँडलाईन फोनचा वापर करत असाल तर लक्ष द्या. कारण तुमचा लँडलाईन फोन 10 अंकांचा होण्याची शक्यता आहे. ‘ट्राय’ने यासंदर्भात नवा प्रस्ताव सादर केला असून त्याअंतर्गत लँडलाईन नंबरच्या डायलिंग प्रणालीत बदल होण्याची शक्यता आहे. ट्रायच्या नव्या प्रस्तावानुसार, लँडलाईन किंवा फिक्स्ड लाईनवरून स्थानिक कॉल करण्यासाठी 10 अंक पूर्ण डायल करावे लागतील. म्हणजे लँडलाईन नंबर मोबाईल नंबरसारखा होईल.
निष्क्रिय असलेले लँडलाईन नंबर बंद करण्याची सूचना ट्रायने दिली आहे. एसटीडी कोड सिस्टिमही बंद केली जाईल. नवीन नंबरिंग प्रणाली राज्य किंवा टेलिकॉम सर्कल स्तरावर लागू होईल. यामध्ये फिक्स्ड लाईन सेवेसाठी 10 अंकी नंबरिंग योजना एलएसएच्या (लायसन्स प्राप्त सेवा क्षेत्र) आधारे लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे फोन नंबर कमी पडण्याची समस्या दूर होईल.
नव्या नियमांनुसार फिक्स्ड लाईनवरून फिक्स्ड लाईनला कॉल करण्यासाठी नंबराच्या आधी शून्य लावावा लागेल. शून्य, त्यानंतर एसटीडी कोड, ग्राहकाचा नंबर डायल करावा लागेल.
जर कोणताही फिक्स्ड लाईन फोन 90 दिवस वापरलेला नसेल तर तो निष्क्रिय केला जाईल. निष्क्रिय झाल्यानंतरही त्या नंबरला 365 दिवस सुरक्षित ठेवले जाईल, नंतर कायमस्वरूपी बंद केले जाईल.