
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफ खात्यातून ऍडव्हान्स क्लेमच्या ऑटो सेटलमेंट (एएसएसी)ची मर्यादा 1 लाख रुपयांवरून आता थेट 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता पाच लाखांपर्यंतची रक्कम काढता येईल.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी 28 मार्च रोजी श्रीनगर येथे झालेल्या ईपीएफओच्या कार्यकारी समितीच्या (ईसी) 113 व्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला. केंद्रीय विश्वस्त मंडळाने (सीबीटी) या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर, कर्मचारी मॅन्युअल पडताळणीशिवाय त्यांच्या पीएफ खात्यातून पाच लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतील. या निर्णयामुळे कोटय़वधी लोकांना याचा थेट फायदा मिळू शकणार आहे. सध्या
ईपीएफओच्या सदस्यांना केवळ
1 लाख रुपयांपर्यंतचा पीएफ ऑटो क्लेमद्वारे काढण्याची मुभा आहे. एक लाखांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल ईपीएफओ अधिकाऱयांकडून
मॅन्युअल पडताळणी करणे आवश्यक आहे.
ऑटो क्लेम म्हणजे काय?
ऑटो सेटलमेंट ऑफ ऍडव्हान्स क्लेम (एएसएसी) किंवा ऑटो क्लेम ही पीएफ (प्रॉव्हिडंट फंड)मध्ये एक स्वयंचलित सॉफ्टवेअर सिस्टम आहे. हे कोणत्याही मॅन्युअल पडताळणीशिवाय तुमचा पीएफ काढणे किंवा सेटलमेंट क्लेम लवकर मंजूर करेल. जर तुमचे केवायसी (आधार, पॅन, बँक खाते) ईपीएफओकडे पडताळणी केलेले असेल, तर सिस्टम 3 ते 5 दिवसांच्या आत तुमचा दावा आपोआप मंजूर करेल. यामध्ये तुम्हाला कागदपत्रे सादर करण्याची किंवा कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. सर्वकाही घरबसल्या ऑनलाईन करता येईल.
यूपीआय-एटीएममधून पैसे मिळणार
कर्मचाऱयांना पीएफ काढण्यासाठी आता पूर्वीसारखी मेहनत करावी लागणार नाही. कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे काढण्यासाठी लवकरच डेबिट कार्डसारखे ईपीएफओ पैसे काढण्याचे कार्ड दिले जाईल. यामुळे ते एटीएममधून तत्काळ पैसे काढू शकतील. कार्ड मिळाल्यानंतर कर्मचारी यूपीआयद्वारे त्यांचे पीएफ बॅलन्सदेखील तपासू शकतील. यूपीआयमधून पैसे काढण्यासाठी पीएफ खाते यूपीआयशी लिंक करावे लागेल.