आधीच प्रदुषित असलेल्या चंद्रपूरमध्ये हिवाळ्यात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे. विशेषतः थर्मल पॉवर स्टेशनच्या धुळीमुळे प्रदूषणात पुन्हा वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून दिसून आले. सुक्ष्म धुळीकणाचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे. चंद्रपूर शहरात मागील नोव्हेंबर महिन्यातील सर्व दिवस प्रदूषित होते. नोव्हेंबरमध्ये Moderate AQI : 29 दिवस 101-200 तर एक दिवस AQI 201-300 म्हणजे अतिशय प्रदूषित होता, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
Air quality index 0-50 दरम्यान असेल तर तो चांगला मानला जातो. पण चंद्रपुरात यापेक्षा अधिक AQI दिसून आला. समाधानाची बाब म्हणजे अतिशय धोकादायक प्रदूषण इथे आढळलेले नाही. हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीतकमी 3 तर, जास्तीतजास्त 8 प्रदुषकाना प्रमाण मानले जाते. त्यात धुलीकण, ओझोन, कार्बन मोनॉक्साईड, सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, अमोनिया, लीड या प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो. वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर, रस्त्यावरील धूळ, इंधन -कचरा ज्वलन, बांधकाम, स्थानिक वीज केंद्र यामुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषणात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते. थंडी आणि संथ वाऱ्यामुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चांगला मानला जात असे. परंतु अलीकडे प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. दमा, ब्रॉकायटिस, टीबी, हृदयरोग आणि मानसिक रोग यामुळे संभवतात. यामुळे येथील वाढत्या प्रदूषणावर वेळीच आळा घालण्याची गरज अभ्यासकांनी व्यक्त केलीय.