जीवनशैली बदला, मधुमेह पळवा!

बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी, व्यायामाचा अभाव, कामाचे अनियमित तास, झोपेचा अभाव, मद्यपान यांसारख्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढत असल्याने मधुमेह आजाराची समस्या उद्भवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी वृद्धत्वात ही समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत होते. मात्र, अलीकडच्या काळात लहान वयातच या आजाराची समस्या उद्भवत असून, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे मधुमेहासारख्या आजाराला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे, असा सल्ला मधुमेहतज्ज्ञांनी दिला आहे.

14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मधुमेह आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि चांगल्या जीवनशैलीचा अवलंब करावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. जगातील मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे हिंदुस्थानात आहेत. त्यामुळे हिंदुस्थानला ‘मधुमेहाची राजधानी’ अशी निराशाजनक ओळख प्राप्त झाली आहे. वाढती मधुमेहाची समस्या ही आरोग्यासाठी एक गंभीर स्थिती बनली आहे. या आजारामुळे हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार आणि दृष्टी कमी होणे यांसारखे दुष्परिणाम उद्भवू शकतात.हिंदुस्थानातील वाढत्या मधुमेहाचा संबंध प्रामुख्याने जीवनशैलीतील बदलांशी आहे.

मधुमेहाबाबत जागरूकता झाली असली, तरी आपण काय खातो? आपली जीवनशैली बरोबर आहे का? याबाबत अजूनही गांभीर्याने विचार केला जात नाही. त्यामुळे कमी वयात वजन वाढणे, पोटाचा घेर वाढणे, मधुमेह आणि कालांतराने त्यातून निर्माण होणारी गुंतागुंतदेखील कमी वयात उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. वाढलेले वजन-लठ्ठपणा-मधुमेह हे एक दुष्टचक्र निर्माण झाले आहे. ते वेळीच ओळखून रोखणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी बाहेरचे तळलेले किंवा पॅकेज्ड फूड्स टाळून पारंपरिक आणि घरच्या अन्नाचे सेवन हे चांगल्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा घटक असल्याचे प्रसिद्ध मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांनी सांगितले.

आहाराच्या सवयींमध्ये झपाट्याने होणारे बदल, बैठी जीवनशैली आणि शरीराचे वजन वाढणे हे शहरी आणि निमशहरी भागात मधुमेहाचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरणारे प्राथमिक घटक आहेत.जगातील मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे हिंदुस्थानात आहेत.

व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे सध्या मधुमेह आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेह आजाराला रोखण्यासाठी खाण्याच्या चांगल्या सवयी, नियमित व्यायाम यांसारख्या गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.