टेनिस किंग नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झालेल्या दुखापतीवर मात करत आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी स्पॅनिश कार्लेस अल्काराझचा 4-6, 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला आणि आपल्या रौप्य महोत्सवी ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाच्या दिशेने धाव घेतली. आता त्याची गाठ शुक्रवारी जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवशी पडेल. जोकोविच आणि अल्काराझ यांच्यातील संघर्ष पहिल्या सेटपासूनच दिसला. पहिला सेट जोकोविच सहज जिंकेल असे वाटत होता, पण त्याच्या दुखापतीने त्याला अडचणीत आणले. दुखण्यावर उपचार करून तो पुन्हा मैदानात उतरला, पण त्याची खेळाची लय तुटली. याचा फायदा कार्लेस अल्काराझने उचलला आणि पहिला सेट 6-4 असा आपल्या ताब्यात घेतला. पहिला सेट गमावल्यानंतर जोकोविचने कमबॅक करत दुसरा सेट जिंकला. पुढे प्रत्येक सेटमध्ये चुरशीची लढत झाली, पण शेवटी जोकोविचनेच विजयाला गवसणी घातली. दुसऱया सेटनंतर त्याने अल्काराझला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही. जोकोविचच्या 25 व्या जेतेपदाच्या मार्गात अल्काराझच सर्वात मोठा अडथळा होता. आता तोच दूर झाल्यानंतर जोकोविचची सिल्व्हर ज्युबिली पक्की मानली जात आहे.