जोकोविचने मोडला फेडररचा विक्रम

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच हा एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेची उपांत्य फेरीत गाठणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने सदाबहार खेळाडू रॉजर फेडररचा तब्बल 6 वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडला. फेडररने 2019 मध्ये इंडियन वेल्स आणि मियामी ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचून हा विक्रम केला होता. तेव्हा तो 37 वर्षे आणि 7 महिन्यांचा होता. नोवाक जोकोविचने 37 वर्षे आणि 10 महिने वयाचा असताना मियामी ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. जोकोविचने आतापर्यंत 24 ग्रँड स्लॅम किताब जिंकले आहेत. त्याने 10 ऑस्ट्रेलियन ओपन, 3 फ्रेंच ओपन, 7 विम्बल्डन आणि 4 यूएस ओपन जेतेपदे जिंकली आहेत. तो अनेक वेळा जागतिक क्रमवारीत अक्वल स्थानावर राहिला आहे आणि जास्तीत जास्त आठवडे अक्वल स्थानावर राहण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.