मिंधे गटाचे आमदार नरकेंचा उन्माद सुरूच

विधानसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघातून निसटता विजय मिळवून निवडून येताच मिंधे गटाचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या विजयाचा उन्माद काही थांबलेला नाही. आता वडणगेच्या माजी सरपंचाला गैरव्यवहाराच्या आरोपावरून एक कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची नोटीस नरके यांनी वकिलामार्फत बजावली आहे.

करवीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ करवीर तालुक्यातील वडणगे येथे झाला होता. यावेळी झालेल्या सभेत माजी सरपंच सचिन चौगले यांनी नरके यांचे नाव न घेता गावातील शिव-पार्वती तलावाच्या कामासंदर्भात ठेकेदारच त्यांचे बंधूंचे असल्याने तीन कोटी 70 लाखांच्या कामात एक कोटीचा घपला करण्याचा कट होता. आता नव्याने मंजूर केलेल्या 15 कोटींच्या कामातही त्यांचा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप केला होता. पण निवडणूक निकालानंतर विजयी होताच नरके यांनी या आरोपाची गांभीर्याने दखल घेत वडणगे गावचे माजी सरपंच सचिन चौगले यांना वकिलामार्फत थेट कायदेशीर नोटीसच बजावली आहे. चौगले यांनी केलेला आरोप आपली प्रतिमा मलीन करून लोकांची दिशाभूल करणारा व बिनबुडाचा आहे. त्यामुळे त्यांना कायदेशीर नोटीस बजावली असून, त्यांनी हा आरोप मागे घेऊन दोन दिवसांत जाहीर माफी मागावी; अन्यथा न्यायालयात एक कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा या नोटिशीतून दिला आहे.