धर्म नाही, तर मुलांचे कल्याण महत्त्वाचे आहे; वडिलांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

तीन वर्षाच्या मुलीला पत्नीने जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप करत हायकोर्टात धाव घेणाया मुस्लिम पित्याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. धर्म हा घटक महत्त्वाचा नाही तर मुलांचे कल्याण महत्त्वाचे आहे असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने पित्याची याचिका फेटाळून लावली.

3 वर्षांच्या मुलीचा पत्नी दिल्ली येथे पळवून घेऊन गेल्याचा दावा करत पित्याने मुंबई उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली होती. मुलीचा ताबा त्याच्याकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी त्याने याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर आज सोमवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्याने इस्लामिक कायद्यानुसार, वडील हे मुलाचे नैसर्गिक पालक असल्याचा युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे कान उपटले व नमूद केले की, अशा प्रकरणांमध्ये मुलाच्या कल्याणाचा विचार करण्यासाठी न्यायालयासमोर धर्म हा एकमेव विचार येत नाही. कारण तो निर्णायक घटक नाही. तर अल्पवयीन मुलाच्या कल्याणासाठी काय महत्त्वाचे आहे हे न्यायालयाला विचारात घ्यावे लागते त्यानुसार आमच्या मते तीन वर्षाच्या मुलीच्या कल्याणासाठी ती तिच्या आईच्या ताब्यात असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने पित्याची याचिका फेटाळून लावली.