नाशिक नाही, आम्ही त्र्यंबकेश्वर कुंभमेळाच म्हणणार, महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचे मत

>> बाबासाहेब गायकवाड

पवित्र गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर आणि तीर्थराज कुशावर्ताला विशेष महत्त्व असल्याने आम्ही त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असेच म्हणणार, असे मत किन्नर आखाडय़ाच्या आचार्य महामंडलेश्वर स्वामी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी व्यक्त केले.

कुंभमेळ्याच्या तयारीची माहिती घेण्यासाठी नाशिक दौऱयावर आलेल्या स्वामी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी दैनिक ‘सामना’शी संवाद साधला. कुंभमेळ्याचा उल्लेख करताना ‘नाशिक आधी की त्र्यंबकेश्वर?’ या वादावर बोलताना त्या म्हणाल्या, यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत माझ्याकडून चुकून नाशिक कुंभमेळा असा उल्लेख झाला. तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. तेथील तीर्थराज कुशावर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आम्ही शैव संन्यासी परंपरेतील आहोत. जुन्या आखाडय़ाशी किन्नर आखाडय़ाचे गठन झालेले आहे, त्यांच्याबरोबरच आमचे शाही स्नान होईल. माझे गुरू हरीगिरी महाराज आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरीजी महाराज यांच्या आदेशाप्रमाणेच आम्ही वाटचाल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह प्रशासनाने आमच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. 99 वर्षांच्या करारावर आम्हाला नाशिक किंवा त्र्यंबकेश्वरला जागा द्यावी, तेथे आश्रम बांधू. आम्ही हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करू, मंदिर बांधू, किन्नर आखाड्याचा विस्तार करू. त्यासाठी जागा मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. कुठलाही भेदभाव न करता इतरांप्रमाणेच सिने अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्याबाबत बोलताना त्रिपाठी म्हणाल्या की, त्यांची महामंडलेश्वर पदवी कायम असून त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात महामंडलेश्वर यमाई ममतानंदगिरी म्हणून सहभागी होतील. किन्नर आखाडय़ाची संस्थापक मीच असून महंत अजयदास यांचा या आखाडय़ाशी कुठलाही संबंध नाही. आम्ही त्यांना काढून टाकले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हिंदू-मुस्लिम द्वेष मान्य नाही

सध्या विशिष्ट लोकांकडून हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवला जातोय याबाबत त्या म्हणाल्या, मी सामाजिक समरसतेवर विश्वास ठेवते. हिंदू-मुसलमान असे करून कोणत्याही समाजाला फायदा होणार नाही. समाजाच्या नावाखाली विषमता निर्माण करून जातीय सलोखा बिघडवणे हे मला मान्य नाही. मथुरा असो की ज्ञानवापी असो, हिंदूंचे जे आहे ते त्यांना मिळायलाच पाहिजे. भेदभाव करून, दोन समाजामध्ये फुकटची लढाई करून काहीही साध्य होणार नाही. हिंदू धर्माला जे हक्काचं आहे ते मिळायलाच हवं, पण हिंदू-मुस्लिम द्वेष मला मान्य नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यातही भेदभाव, जातपात, रंगभेद याला स्थान नाही. सर्व जाती-धर्माचे लोक तीर्थकुंडांमध्ये स्नान करतात. कुंभमेळ्यात सामाजिक समरसतेची शिकवण मिळते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.