भाजपच्या धमक्यांना घाबरत नाही; अनिल देशमुख यांच्या पुत्राने ठणकावले

अनिल देशमुख आजही जामिनावर आहेत, अशी धमकी देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख यांचे पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी फडणवीस आणि भाजपचा समाचार घेतला. असल्या पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असे ते म्हणाले.

 न्यायालयाने अनिल देशमुख यांना मेडिकल ग्राउंडवर जामीन दिलेला नाही तर त्यांच्या विरोधातील प्रकरणात विश्वासार्हता नसल्याच्या मेरीटवर जामीन दिला आहे. धमक्या देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्यांनी आधी न्यायालयाने जामीन देताना जे निरीक्षण नोंदवले आहे त्याचा अभ्यास करावा, असे सलील देशमुख म्हणाले. दोन वर्षांपूर्वी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी देशमुख यांना क्लीन चिट दिली होती. अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत, ऐकीव माहितीवर त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, असे न्यायालयाने म्हटले होते. तसेच कागदपत्रे पाहता अनिल देशमुख या प्रकरणात दोषी ठरू शकणार नाहीत, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते, असे सलील म्हणाले.