![3](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/3-696x869.jpg)
प्रत्येक नववधूसाठी लग्नाची खरेदी हा एक खूप महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. लग्नाची खरेदी करताना सर्वात महत्त्वाची म्हणजे नथ… नऊवारी साडीवर नथ आणि नटलेली वधू म्हणजे सौंदर्याची खाणच जणू.. नऊवारी साडीवर नथ परीधान करताना मात्र अनेक गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. पारंपारिक नथ नववधूच्या सौंदर्यात चांगलीच भर घालते.
नथ हा सर्व दागिन्यांमधील मानाचा आणि महत्त्वाचा दागिना मानला जातो. खासकरुन मराठमोळ्या लग्नांमध्ये नथीचा नखरा मिरवताना करवल्यासुद्धा आपल्याला दिसून येतात. याच नथीचा नखरा मिरवताना नथ घेताना काय काळजी घ्यायला हवी हे आपण बघूया.
नथीमध्ये सुद्धा बरेच प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे नथ घेताना ती कशी असायला हवी याची उत्तम माहिती असणे गरजेचे आहे. नथींमध्ये ब्राम्हणी नथ, मोत्याची नथ, पाचूची नथ, पेशवाई नथ, पुणेरी नथ इत्यादी नानाविध प्रकार पाहायला मिळतात. आता नव्या ट्रेंडप्रमाणे नवरा मुलाच्या नावाची नथ घालण्याची सुद्धा प्रथा सुरु झालेली आहे. त्यामुळे नवीन ट्रेंडस् काय आले आहेत हे न विसरता जाणून घ्या आणि मगच नथीची खरेदी करा.
तुमचे नाक टोचले नसेल तर, नथीची निवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खूप जड नथ घेऊ नका. खूप जड नथ ही नाकातून घसरण्याची आणि पडण्याची भिती असते. लग्नाआधी किमान घरी ही नथ घालून बघा म्हणजे ही नथ तुम्ही कॅरी कशी कराल याची तुम्हाला खात्री पटेल.