बुद्धिबळ विश्वातील अव्वल आणि पाच वेळा जगज्जेतेपद काबीज करणाऱया नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसननेच टाटा स्टील हिंदुस्थान बुद्धिबळ स्पर्धेतील रॅपिड आणि ब्लिट्झ या दोन्ही स्पर्धांचे जेतेपद पटकावत दुसऱयांदा दुहेरी यश मिळवण्याचा अनोखा पराक्रम केला. 2019 साली कार्लसन प्रथमच या स्पर्धेत खेळला होता आणि त्याने दुहेरी धमाका केला होता. यंदाही त्याने त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती केली. या स्पर्धेच्या इतिहासात दुहेरी पराक्रम दोनदा करणारा कार्लसन एकमेव खेळाडू ठरला आहे.
रॅपिड प्रकारात कार्लसनच्या खेळाला कुणीच आव्हान देऊ शकला नाही. अपराजित राहिलेल्या कार्लसने 9 डावांपैकी 6 डावांमध्ये विजय आणि 3 ड्रॉ राखत 7.5 गुणांसह अव्वल स्थान राखले. हिंदुस्थानचा आर. प्रज्ञानंदा आणि अमेरिकन वेस्ली सो यांनी 5.5 गुणांसह दुसरे आणि तिसरे स्थान संपादले. ब्लिट्झ प्रकारातही कार्लसनने पहिले स्थान राखले. 18 फेऱयांच्या या स्पर्धेत 15 फेरीपर्यंत हिंदुस्थानचा अर्जुन एरीगेसी आघाडीवर होता. मात्र शेवटच्या तीन डावांत त्याला विदित गुजराथी, मॅग्नस कार्लसन आणि प्रज्ञानंदाकडून हार सहन करावी लागली आणि तो 10.5 गुणांसह तिसऱया स्थानावर फेकला गेला. कार्लसनने सर्वाधिक 13 गुण मिळवले, तर अमेरिकेचा वेस्ली सो 11.5 गुणांसह दुसरा आला. महिलांच्या गटात रॅपिडमध्ये रशियन ऍलेक्झांद्रा गोरीया चकिनाने, तर ब्लिट्झमध्ये रशियाच्याच कॅटेरिया लागनोने
बाजी मारली.