शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी अटकेत

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली व्यावसायिकाची 61 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. लाछेन शॉपी, भीमबहादूर प्रधान आणि रमेशकुमार अभिमन्यू अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हे गोरेगाव येथे राहतात. गेल्या वर्षी ते घरी होते. तेव्हा त्यांना मोबाईलवर फोन आला. त्यानंतर त्याना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. त्या ग्रुपमध्ये दोनशेहून अधिक सदस्य होते. बहुतांश सदस्य हे ऑनलाइन होते. ग्रुपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगबाबत माहिती दिली जायची. ठगाने तक्रारदार यांना प्रलोभन दाखवून गुंतणूक करण्यास सांगितले. त्यासाठी त्यांचे खाते उघडावे लागेल असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याने सुमारे 61 लाख रुपयांची गुंतवणूक केली.

गुंतवणूक केलेल्या रकमेवर तीस टक्के परतावा देण्याचे त्यांना आश्वासन देण्यात आले. त्याने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्कम निघत नसल्याने त्याने कस्टमर केअरला फोन केला. तेव्हा त्यांना आणखी 21 टक्के रक्कम भरावी लागेल असे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले.