उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन हा त्याच्या विचित्र स्वभावामुळे चर्चेत असतो. आताही त्याने असेच एक फर्मान काढल्याने त्याची आणि त्याच्या फर्मानाची सर्वत्र चर्चा होत आहे. अमेरिकेतील स्ट्रीट फूड म्हणून नावाजलेले हॉट डॉग उत्तर कोरियात गेल्या काही वर्षापासून लोकप्रिय होत आहे. हॉट डॉगची वाढती लोकप्रियता बघता किम जोंग उनने नवे फर्मान जारी केले आहे. यापुढे उत्तर कोरियात हॉट डॉग खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच हॉट डॉग खाताना आढळल्यास त्याला देशद्रोही ठरवत श्रमशिबिरात डांबण्याचे फर्माम किम जोंग उन याने जारी केले आहे.
उत्तर कोरियात हॉट डॉग बनवताना किंवा खाताना कोणी आढळले, तर त्याला देशद्रोही ठरवत त्याला श्रमशिबिरात पाठवण्यात येणार आहे. मात्र, हॉट डॉग खाणे आणि देशद्रोह याचा काय संबंध अशी चर्चा जगभरात सोशल मिडीयावर सुरू आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियाचे ताणलेले संबंध सर्वज्ञात आहेत. याच आकसापोटी हा निर्णय़ घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
हॉट डॉग हे पाश्चात्य संस्कृतीचे प्रतीक आहे. त्याची लोकप्रियता आणि प्रभाव उत्तर कोरियात वाढत आहे. उत्तर कोरियात अमेरिकन संस्कृतीचा प्रभाव रोखण्यासाठी हॉट डॉगवर बंदी घालण्यात आली आहे. भांडवलशाही संस्कृतीचे प्रतिक मानत यावर बंदी घालण्यात आली आहे. 2017 नंतर उत्तर कोरियात याची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. मात्र, या फर्मानांतर सर्व विक्रेत्यांनी दुकाने बंद केली असून आता हॉट डॉगची विक्री करण्यात येत नसल्याचे सांगितले. उत्तर कोरियात देशद्रोहासाठी कठोर आणि क्रूर शिक्षांची तरतूद आहे. तसेच हॉट डॉग खाल्ल्यास श्रमशिबिरात पाठवण्याच्या शिक्षेची घोषणा करण्यात आली आहे. ही श्रमशिबिरेही क्रूरतेसाठी आणि अन्याय, अत्याचारासाठी ओळखली जातात. त्यामुळे उत्तर कोरियात या शिक्षेबाबत दहशत आहे.