देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. काही राज्यांमध्ये तापमानाने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. उष्माघाताच्या त्रासाने देशातील जनता आजारी पडत आहे. त्यात उत्तर हिंदुस्थानात 25 मे पासून नौतापाला सुरूवात झाली होती. या 9 दिवसात सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो यामुळे पृथ्वीवर उष्णतेच्या प्रमाणात भयानक वाढ झालेली पाहावयास मिळत आहे. मात्र या नौतापाचा रविवारी म्हणजेच 2 जून रोजी शेवटचा दिवस असून नौतापाचा प्रताप कमी होईल.
गेल्या 9 दिवसांमध्ये उष्णतेने आत्ता पर्यंतच्या सर्व मर्यादा पार करून नवा रेकॉर्ड ब्रेक केला. यामध्ये अनेक जण आजारी पडले तर काहींना जीव गमवावा लागला. केंद्र सरकारने दिलेल्या अहवालानुसार एकट्या मे महिन्यात 46 जणांचा मृत्यू झाला आहे.
उष्माघाताच्या प्रकरणांमध्ये 1 मार्चपासून 24,849 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 19,189 प्रकरणे मे महिन्यात नोंदवली गेली. तर एकूण 56 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यामध्ये मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून त्यानंतर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व राजस्थानमध्ये मृत्यू झाले आहेत.
नौतापा म्हणजे काय?
उत्तर हिंदुस्थानात नौतापाच्या 9 दिवसांमध्ये सूर्यदेव आपले उग्ररूप दाखवतात. यावेळी पृथ्वीवर तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेचा कालावधी असतो. ज्योतिष शास्त्रानुसार ज्येष्ठाच्या महिन्यात सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो. तेव्हा उष्णतेच्या प्रमाणात प्रचंड वाढ होते. रोहिणी हे चंद्राचे नक्षत्र आहे, म्हणून जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा चंद्राची शीतलता कमी होते आणि 9 दिवस तीव्र उष्णता असते.