उष्म्याच्या असह्य लाटेने होरपळणाऱया उत्तर भारतात शुक्रवारी किमान 40 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 25 निवडणूक कर्मचारी असून, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये उद्या होणाऱया मतदानासाठी ते कामावर तैनात होते.
अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारीही ओडिशा (10), बिहार (8), झारखंड (4) आणि उत्तर प्रदेश (1) अशी उष्माघाताच्या बळींची नोंद झाली आहे. राजस्थानमध्ये उष्णतेमुळे आतापर्यंत किमान पाच मृत्यू झाले आहेत.
कानपूरला 48.2 तापमान
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कानपूर हवामान पेंद्रात 48.2 तापमान नोंदवले गेले. हरियाणाचे सिरसा हे 47.8 अंश सेल्सिअस तापमानात चटके देत होते. दिल्लीच्या आयानगरमध्ये शहराचे कमाल तापमान 47 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. .
उष्माघाताचे सर्वाधिक बळी उत्तर प्रदेशात
शुक्रवारी नोंदवलेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक 17 उत्तर प्रदेशातील, 14 बिहारमधील, पाच ओडिशातील आणि चार झारखंडमधील होते. झारखंडमध्ये 1300 हून अधिक लोक उष्माघाताने रुग्णालयात दाखल आहेत. उत्तर प्रदेशात सोनभद्र जिल्हा आणि मिर्झापूरसह 13 जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. तेथील मृतांमध्ये सात होमगार्ड जवान, तीन स्वच्छता कर्मचारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयात नियुक्त एक लिपिक, एक चकबंदी अधिकारी (एकत्रीकरण अधिकारी) आणि होमगार्ड टीममधील एक शिपाई यांचा समावेश आहे. बिहारमध्ये गेल्या दोन दिवसांत उष्माघातामुळे 10 मतदान कर्मचाऱयांसह चौदा लोकांचा मृत्यू झाला आहे.