
>> अॅड. प्रतीक राजूरकर
कांचनगंगा एक्स्प्रेस अपघातानंतर उत्तर आणि उत्तर-मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे मंडळाला महत्त्वाच्या रेल्वेचा वेग 160 किमीवरून 130 वर करण्याची मागणी केली आहे. वेगवान ट्रेनच्या वेगात कपात केल्याने देशभरात रेल्वेच्या वेळापत्रकात मोठा बदल होईल. अतिजलद रेल्वेने 130 कि.मी. टप्पा 30 वर्षांपूर्वीच गाठला होता. आता पुन्हा रेल्वेच्या वेगाला वंदे भारत ट्रेनसाठी इतर रेल्वेच्या वेगाला तीन दशके मागे नेण्याचा हा प्रकार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. कालानुरूप वेग वाढायला हवा तिथे वेगाच्या बाबतीत कुठलीच प्रगती नसल्याचे हे लक्षण आहे.
गेल्या महिन्यात घडलेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत आणि रेल्वे प्रशासनावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पॅगने 2017 ते 2021 दरम्यान घडलेल्या रेल्वे अपघातांवर अनेक धक्कादायक निरीक्षणे नोंदवलेली आहेत. पॅगच्या मते रेल्वे प्रशासनाने राष्ट्रीय रेल संरक्षक कोषाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे. राष्ट्रीय रेल संरक्षक कोषाने ठरवून दिलेल्या कामांना प्राधान्य देण्याऐवजी अनावश्यक खर्च केल्याचे पॅगने नमूद केले आहे. भूतकाळातील घडलेल्या चुकांतून रेल्वे प्रशासनाने कुठलाच धडा घेतला नसल्याचा ठपका अहवालात पॅगने ठेवलेला आहे. प्रकाशित माहितीनुसार अर्ध्यापेक्षा अधिक अपघातांसंबंधित अहवाल सादर होण्यास होत असलेला विलंब चिंताजनक आहे. रेल्वेच्या अनियमित वेळापत्रकाचा अवगुण अपघातांच्या अहवालासारख्या संवेदनशील विषयात दुर्दैवी ठरतो.
गेल्या महिन्यातील अपघात हा मानवी चुकीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेला. हा अपघात मालवाहक रेल्वे आणि प्रवासी रेल्वेत झाला. यावर अभ्यासकांनी मालवाहक रेल्वेच्या वाढलेल्या गतीबाबत आणि लांब पल्ल्याच्या कांचनगंगा प्रवासी रेल्वेला रंगपाणी स्थानकावर का थांबवण्यात आले? याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या चार वर्षांपासून रेल्वे सुरक्षा कवच उपकरण अंमलबजावणी सुरू करण्यात आली. या कालावधीत केवळ 1465 कि.मी रेल्वेमार्गावर कवच प्रणाली कार्यरत आहे. देशातील एकूण 68 हजार किमीपैकी केवळ 2 टक्के रेल्वेमार्गावर कवचाचे काम पूर्ण झाले आहे. अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या कवच प्रणालीच्या कामावर म्हणूनच तज्ञ, अभ्यासकांची टीका योग्य ठरते. ओडिशाच्या बालासोर येथे गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या अपघातात कोरोमंडल एक्स्प्रेसचा वेग 130 किमीचा असल्याचा अंदाज वर्तवला गेला. अपघातानंतर असे लक्षात आले की, वंदे भारत ट्रेनचा मार्ग आणि सिग्नल व्यवस्थेसाठी इतर काही ट्रेनच्या वेगाला गती देण्यात आली. गेल्या वर्षीच्या रेल्वे अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही सूचना केल्या गेल्या. रेल्वेंचा वेग वाढवायचा असल्यास अगोदर त्या मार्गावर कवच प्रणाली कार्यरत असल्याची खात्री व्हावी. त्यानंतरच रेल्वेचा वेग वाढवण्याचा निर्णय घ्यावा असे अभ्यासकांचा आणि रेल्वे अधिकाऱयांचे मत होते. परंतु तसे न होता वंदे भारत ट्रेनसाठी वेग वाढवला जात आहे अशी शंका निर्माण झाली आहे. 160 कि.मी. वेगाने धावणाऱ्या रेल्वेसाठी सुरक्षा कवच उपाययोजना अत्यावश्यक आहे. सोबतच 110-140 कि.मी. वेगाने धावणाऱ्या रेल्वेसाठीसुद्धा सुरक्षा कवच उपाययोजना केल्यास फायद्याचेच ठरेल असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. प्रकाशित माहितीनुसार दिल्ली-आग्रा-झाशी यादरम्यान धावणाऱ्या रेल्वेचा वेग आता गेल्या महिन्यातील अपघातानंतर मंदावला आहे. 160 कि.मी. वेगाने धावणाऱ्या वंदे भारतचा वेग या मार्गावर 130 किमीवर आणण्यात आला. त्याला कारण ठरले आहे सदोष उपकरणे.
रेल्वेच्या वेगाबाबत दुसरा मतप्रवाह बघायला मिळतो. काही अभ्यासकांनी दावा केला आहे की, कांचनगंगा एक्स्प्रेस अपघातानंतर उत्तर आणि उत्तर-मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे मंडळाला महत्त्वाच्या रेल्वेचा वेग 160 किमीवरून 130 वर करण्याची मागणी केली आहे. वेगवान ट्रेनच्या वेगात कपात केल्याने देशभरात रेल्वेच्या वेळापत्रकात मोठा बदल होईल. अतिजलद रेल्वेने 130 कि.मी. टप्पा 30 वर्षांपूर्वीच गाठला होता. आता पुन्हा रेल्वेच्या वेगाला वंदे भारत ट्रेनसाठी इतर रेल्वेच्या वेगाला तीन दशके मागे नेण्याचा हा प्रकार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. कालानुरूप वेग वाढायला हवा तिथे वेगाच्या बाबतीत कुठलीच प्रगती नसल्याचे हे लक्षण आहे. 26 जून रोजी एका प्रतिष्ठत इंग्रजी दैनिकाने बातमी प्रकाशित केली आहे की, ठरावीक रेल्वेमार्गांवर वंदे भारत, गतिमान एक्स्प्रेसचा वेग 160 वरून 130 कि.मी., तर शताब्दी एक्स्प्रेसचा वेग 150 किमीवरून 130 कि.मी. प्रतितास करण्याचा प्रस्ताव आहे. असे झाल्यास या रेल्वेच्या वेळापत्रकात 25-30 मिनिटांचे अंतर/विलंब होईल. 6 नोव्हेंबर 2023 पासूनच हा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे प्रलंबित होता. आता उत्तर-मध्य रेल्वेकडून नव्याने प्रस्ताव आल्याने त्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे.
हिंदुस्थानात पहिल्यांदा रेल्वे अपघात सुरक्षेच्या दृष्टीने कवच प्रणालीची संकल्पना 2012 साली आकाराला आली. 2014 साली 265 कि.मी. रेल्वेमार्गावर कवचची चाचणी झाली. सर्व प्रकारची तांत्रिकता तपासून 2019 साली कवच प्रणालीला मान्यता प्राप्त झाली. कवच प्रणालीच्या विद्यमान अंमलबजावणीचा वेग बघता एकूण 68 हजार कि.मी. लांबीच्या रेल्वेमार्गावर आणि एकूण 15 हजार 200 इंजिनवर ही संकल्पना पूर्णत्वास जाण्यासाठी 46 वर्षांचा कालावधी लागेल असे निराशाजनक चित्र आहे. कवच प्रक्रिया बसवण्याचा वेग प्रतिवर्षी 6800 कि.मी. केल्यास ही प्रक्रिया पूर्णत्वास जाण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागेल. अपूर्ण मानव संसाधने, रेल्वेतील तीन लाख जागा रिक्त असणे कवच प्रणालीच्या विलंबाचे मुख्य कारण आहे. गेल्या महिन्यात घडलेल्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला 18 हजार लोकोपायलटच्या जागा भरण्याची जाग आली आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘We Learn safety rule simply by accidents’. रेल्वे प्रशासनाच्या बाबतीतसुद्धा असेच म्हणावे लागेल. अपघातानंतर सुरक्षेचे नियम त्यांनी अंगीकारावेत हीच अपेक्षा.